कोकण विकास मंडळाला लवकरच मान्यता शक्य
By admin | Published: April 8, 2015 09:50 PM2015-04-08T21:50:33+5:302015-04-08T23:57:46+5:30
घटना दुरुस्तीसाठीचा प्रस्ताव सादर
रत्नागिरी : कोकणच्या विकासासाठी स्वतंत्र विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी भारतीय घटनेच्या संबंधित कलमामध्ये दुरुस्ती करण्याच्या हेतूने राज्य शासनाने केंद्रीय स्तरावर कार्यवाहीला प्रारंभ केला असल्याची माहिती आमदार राजन साळवी यांनी राज्याचे वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या भेटीअंती दिली.
राज्यातील विदर्भ विकास महामंडळ, पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळ, मराठवाडा विकास महामंडळ आदींना विविध योजना वा घटक योजनांतून वेळोवेळी तत्सम प्रकारचे सहकार्य होत असते. यामुळे या ठिकाणी कोकणाच्या तुलनेत राज्यातील हे प्रदेश संबंधित आघाड्यांवर पुढारलेले दिसत असून, याठिकाणी अनेकविध सुविधा उपलब्ध होत असतात. या बाबीच्या पार्श्वभूमीवर निसर्गाने भरभरुन दिलेल्या कोकणासाठीही स्वतंत्र विकास महामंडळ असावे, या प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या मागणीची त्वरित अंमलबजावणी व्हावी, यासाठी कोकणातील शिवसेनेचे आमदार सातत्याने जोरदार पाठपुरावा करीत आहेत. या मागणीला शिवसेनेसोबत भाजपाच्या मंडळींनीही अनुकूलता दर्शवित पाठिंबा दिला होता.
आता राज्यासह केंद्रात शिवसेना - भाजपाची सत्ता आल्याने स्वतंत्र कोकण विकास महामंडळाच्या मागणीने पुन्हा जोर धरला आहे. कोकण महामंडळाची अंमलबजावणी करण्यासाठी या घटनात्मक बाबींची पूर्तता करण्याच्या हालचालींनी वेग घेतला असल्याची माहिती आमदार राजन साळवी यांनी राज्याचे वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर दिली. तसेच कोकणसाठी स्वतंत्र विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी भारतीय घटनेच्या कलम ३७१ (२) (अ)मध्ये घटना दुरुस्ती करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाला सादर केलेल्या प्रस्तावाप्रती केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनाही पत्र देऊन विनंती केली असल्याचे साळवींनी सांगितले. महामंडळाच्या स्थापनेबाबत राज्य शासनाकडून चालू झालेल्या या कार्यवाहीची लेखी माहिती कोकणातील संबंधित लोकप्रतिनिधी व तत्सम यंत्रणेलाही दिली जाईल, असेही मुनगंटीवार यांनी आमदार साळवींना सांगितले. (प्रतिनिधी)