कृ षी सहाय्यकाने लॅपटॉप पळवला
By admin | Published: March 30, 2015 10:42 PM2015-03-30T22:42:24+5:302015-03-31T00:21:30+5:30
राजापुरातील प्रकार : तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार
राजापूर : तालुका कृषी कार्यालयांतर्गत जोरदार संघर्ष सुरु झाला असून, एका कृषी सहाय्यकानेच कार्यालयीन कामकाजाचा लॅपटॉप परस्पर पळवून नेल्याची लेखी तक्रार मंडल कृषी अधिकाऱ्याने तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे केल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. मात्र, या लॅपटॉप चोरी प्रकरणाची परिपूर्ण माहिती तालुका अधिकाऱ्यांना आगाऊ असतानाही त्यांनी घेतलेल्या संशयास्पद भूमिकेमुळे सुरु झालेला अंतर्गत संघर्ष अधिकच चिघळण्याची लक्षणे दिसू लागली आहेत.पाच वर्षांपूर्वी या कार्यालयाच्या शिपायाने केलेल्या धनादेश चोरी प्रकरणानंतर आता पुढे आलेल्या या लॅपटॉप चोरी प्रकरणामुळे कृषी कार्यालयाच्या अनागोंदी कारभाराची लक्तरे वेशीवर आली आहेत. प्रभारी मंडल कृषी अधिकारी ए. आर. कावतकर यांनी आपल्याच कार्यालयातील कृषी सहाय्यक बी. डी. मराडे यांनी आपण वापरत असलेला लॅपटॉप पळवून नेल्याची लेखी तक्रार तालुका कृषी अधिकारी चंद्रमणी मेश्राम यांच्याकडे दि. ७ मार्च २०१५ रोजी केली होती. त्यानुसार कृषी अधिकाऱ्यांनी याबाबत लेखी खुलासा मागितला होता. मात्र, मंडल अधिकारी कावतकर यांनी लॅपटॉप चोरीचा तक्रार अर्ज दाखल करण्यापूर्वी कृषी सहाय्यक मराडे यांनी आपल्याच मालकीच्या असलेल्या व सद्यस्थितीत मंडल अधिकारी कावतकर वापरत असलेल्या या लॅपटॉपवरुन कुणीतरी कर्मचारी वा अधिकारी आपल्या विरोधात वरिष्ठांकडे तक्रार टाईप करुन पाठवत असल्याचे तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या निदर्शनाला आणून दिले होते. त्यानुसार तालुका कृषी अधिकाऱ्यांनी कृषी सहाय्यक मराडे यांना हा लॅपटॉप आपल्याकडे जमा करण्याचे तोंडी आदेश दिले होते. त्यानुसार मराडे यांनी हा लॅपटॉप दि. ७ मार्च रोजीच तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे जमा करत त्याची लेखी पोचपावती घेतली होती. तरीही तालुका कृषी अधिकाऱ्यांनी या प्रकरणी अनभिज्ञता दाखवित कारवाईचे संकेत दिले, असे कृषी सहाय्यक मराडे यांचे म्हणणे आहे.
प्रत्यक्षात या लॅपटॉपशी कृषी कार्यालयाचा काडीचाही संबंध नसल्याचे स्पष्ट करीत तो आपल्या मालकीचा असल्याचे मराडे यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांना दिलेल्या आपल्या लेखी खुलाशात म्हटले आहे. तसेच यापूर्वी पाचल विभागात वादग्रस्त ठरलेले मंडल अधिकारी कावतकर यांनी आता राजापूर मंडलाचा प्रभारी पदभार हाती घेतल्यानंतरही काही कर्मचाऱ्यांना त्रास देण्याचा खटाटोप चालविला आहे. दुसरीकडे तालुका कृषी अधिकारी त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप केला आहे. (प्रतिनिधी)
लॅपटॉप नक्की कुणाचा!
प्रभारी कृषी मंडल अधिकाऱ्यांनी पळविण्यात आलेला तो लॅपटॉप आपल्या कार्यालयाचा असल्याचे ठामपणे सांगितले असतानाच दुसरीकडे तो लॅपटॉप आपल्या वैयक्तिक मालकीचा असून, त्याच्या खरेदीची पावतीदेखील आपल्याकडे असल्याचे कृषी सहाय्यक मराडे यांनीही स्पष्ट केले. त्यामुळे तो लॅपटॉप नक्की कुणाचा आहे, याबाबतचे गूढ वाढू लागले आहे. याप्रकरणी तालुका कृषी अधिकारी हे अद्याप गप्प आहेत ते कशासाठी! त्यांचे मौन नक्की काय दर्शविते, असाही खोचक सवाल आता उपस्थित केले जात आहे.