कुडाळच्या नागरिकांनी धरले मुख्याधिकाऱ्यांना धारेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 06:16 PM2019-01-19T18:16:06+5:302019-01-19T18:19:12+5:30
कुडाळ शहरातील अनधिकृतपणे लावण्यात आलेले बॅनर काढून टाकण्याची मोहीम सुरू असताना नगरपंचायतीच्या एका अधिकाऱ्यांने नागरिकांशी हुज्जत घातल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी मुख्याधिकारी देवानंद ढेकळे यांना धारेवर धरले. यावेळी मुख्याधिकारी व नागरिकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. रात्री घडलेल्या या प्रकारानंतर शहरातील गांधी चौकात नागरिकांनी गर्दी केली होती.
कुडाळ : शहरातील अनधिकृतपणे लावण्यात आलेले बॅनर काढून टाकण्याची मोहीम सुरू असताना नगरपंचायतीच्या एका अधिकाऱ्यांने नागरिकांशी हुज्जत घातल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी मुख्याधिकारी देवानंद ढेकळे यांना धारेवर धरले. यावेळी मुख्याधिकारी व नागरिकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. रात्री घडलेल्या या प्रकारानंतर शहरातील गांधी चौकात नागरिकांनी गर्दी केली होती.
कुडाळ शहरात ठिकठिकाणी लावण्यात आलेले अनधिकृत बॅनर काढून टाकण्याची मोहीम मुख्याधिकारी देवानंद ढेकळे यांच्या आदेशानुसार रात्री उशिरा नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी सुरू केली. मात्र याबाबत कोणतीही पूर्वसूचना न दिल्याने काही नागरिक व व्यापाऱ्यांनी गांधी चौक येथे जमत नाराजी व्यक्त केली.
यादरम्यान गांधी चौक येथील कॅरम स्पर्धेचा बॅनर काढण्यासाठी नगर पंचायतीचे कर्मचारी व अधिकारी गेले. यावेळी हा बॅनर काढू नका, उद्या बॅनरची परवानगी घेऊ, असे या कर्मचाऱ्यांना तेथील काहींनी सांगितले. मात्र यावेळी अधिकाऱ्यांने नागरिकांशी हुज्जत घातल्याने शाब्दिक बाचाबाची झाली.
या प्रकारामुळे नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी तिथे आलेले नगरपंचायतीचे मुख्याधिकारी देवानंद ढेकळे व कुडाळातील नागरिकांची शाब्दिक बाचाबाची झाली. प्रशासनाने कारवाई करावी, मात्र कर्मचारी, अधिकाऱ्यांनी कायद्याची भीती दाखवून जनतेला उद्धट उत्तरे देऊ नयेत, असे म्हणणे नागरिकांनी मांडले. तसेच बॅनरबरोबरच इतर सर्व अनधिकृत गोष्टींवर कारवाई करा, अशी मागणी केली.
यावर ढेकळे यांनी तुम्हाला जे काही सांगायचे आहे ते रितसर कार्यालयात येऊन सांगा. बॅनर हटाव मोहीम नियमाप्रमाणे सुरू असून ती पूर्ण करणारच, असे नागरिकांना सांगितले. तसेच यापुढे शहरात अनधिकृतपणे कोणत्याही प्रकारचे बॅनर लावता येणार नाहीत. बॅनर लावायचे असतील तर नगरपंचायतीची परवानगी घ्यावी, असे जाहीर केले. दरम्यान, बॅनर आठवड्याची मोहीम पहाटेपर्यंत सुरू होती.