कुडाळ नगरपंचायतीत युती करुन लढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2016 01:01 AM2016-03-13T01:01:52+5:302016-03-13T01:01:52+5:30
वैभव नाईक : लाठीचार्जप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांचीही बदली लवकरच होणार
कुडाळ : कुडाळ नगरपंचायत निवडणुकीमध्ये शिवसेना भाजप अशी युती करूनच आम्ही ही निवडणूक लढविण्याचे ठरविले असून डंपर आंदोलनप्रकरणी झालेल्या लाठीचार्जबाबत जिल्हाधिकारी यांची बदली येत्या काही दिवसात होणारच अशी माहिती कुडाळ येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी दिली.
कुडाळ तालुका शिवसेनेची मासिक सभा कुडाळ येथील महालक्ष्मी सभागृहात झाली. या सभेनंतर आमदार वैभव नाईक यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अभय शिरसाट, महिला आघाडी जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर, तालुकाप्रमुख राजन नाईक, एस. टी कामगार सेना जिल्हाप्रमुख संजय पडते, युवा सेना प्रमुख मंदार शिरसाट, नागेंद्र्र परब, संजय भोगटे, सुशील चिंदरकर तसेच इतर शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या पत्रकार परिषदेत बोलताना आमदार नाईक म्हणाले की, कुडाळ नगरपंचायतीची निवडणूक आम्ही खासदार विनायक राऊत व पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून शिवसेना, भाजप व आर.पी.आय अशी एकत्र युती करून लढायचे ठरविले आहे. या संदर्भात आम्ही निर्णय घेण्यासाठी लवकर एकत्र बैठक घेणार असल्याचेही सांगितले.
कुडाळ नगरपंचायतीसाठी इच्छुक उमेदवारांच्या अर्जासंदर्भात पक्षाच्यावतीने समिती नेमली असून या समितीमध्ये अभय शिरसाट, संजय पडते, राजन नाईक, संजय भोगटे, मंदार शिरसाट यांचा समावेश करण्यात आला असल्याची त्यांनी माहिती दिली.
डंपर व्यावसायिकांनी पुकारलेल्या आंदोलनाबाबत बोलताना ते म्हणाले की, हे आंदोलन आम्ही शांततेच्या मार्गाने सुरु ठेवले होते. मात्र आमच्यावर लाठीमार करण्यात आला. आता मात्र पोलीस अधीक्षकांना सक्तीच्या रजेवर जावे लागले आहे. तसेच याबाबत आम्ही जिल्हाधिकारी यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत केली होती. मुख्यमंत्र्यांनीही जिल्हाधिकारी यांची बदली करू असे आम्हाला लाठीमार झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी मुंबईत सांगितले होते. तसेच या आंदोलनात कायदा हातात घेणाऱ्यावरही कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले, अशी माहिती आमदार नाईक यांनी दिली.
मुख्यमंत्री यांनी दिलेल्या आश्वासनांवर शिवसेनेच्यावतीने अभय शिरसाट व संजय पडते यांनी हे आंदोलन मागे घेतले. मात्र, या आंदोलनात राजकारण करीत काँग्रेसने हे आंदोलन सुरूच ठेवले. ज्यासाठी सुरु ठेवले होते ते सर्व मिळाले म्हणून यांनी हे आंदोलन शुक्रवारी थांबविले का? असा टोलाही त्यांनी काँग्रेसला लगावला.
आमच्यावर लाठीमार करणाऱ्या या जिल्हाधिकाऱ्यांची बदली ही होणारच असून यापुढे अधिकाऱ्यांनी चांगले वागावे. आम्हीही सन्मान देवू. मात्र, जनतेवर अन्याय होत असेल तर आम्ही आंदोलने उभारुच असेही सांगितले. (प्रतिनिधी)
आचारसंहितेमुळे कार्यक्रम स्थळात बदल : संजय पडते
शिवसेनेच्यावतीने कुडाळ सिद्धिविनायक हॉल येथे १५ मार्च रोजी दशावतार नाट्य कलावंताना मोफत विम्याचे वाटप, रक्तदान शिबिर, शिवसेना मेळावा व संयुक्त दशावतार नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, कुडाळ नगरपंचायतीच्या आचारसंहितेमुळे हा कार्यक्रम १५ मार्च रोजी पावशी येथील शांतादुर्गा सभागृहात करण्यात येणार असल्याचे संजय पडते यांनी सांगितले.