कुडाळ पंचायत समितीच्या सदस्या संपदा पेडणेकर यांचा तापसरीमुळे मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 05:20 PM2017-11-11T17:20:23+5:302017-11-11T17:27:30+5:30
कुडाळ पंचायत समितीच्या शिवसेना सदस्या व पिंगुळी मोरजकरवाडीतील रहिवासी संपदा संदीप पेडणेकर यांचे तिव्र तापामुळे शनिवारी निधन झाले. हा लेप्टो की अन्य ताप याचे निदान होवू शकले नसल्याचे तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी सांगितले आहे.
कुडाळ, दि. ११ : कुडाळ पंचायत समितीच्या शिवसेना सदस्या व पिंगुळी मोरजकरवाडीतील रहिवासी संपदा संदीप पेडणेकर यांचे तिव्र तापामुळे शनिवारी निधन झाले.
फेब्रुवारी २0१७ मध्ये झालेल्या सार्वत्रिक पंचायत समितीच्या निवडणूकीत त्या ११५४ मतांनी निवडून आल्या होत्या. हा लेप्टो की अन्य ताप याचे निदान होवू शकले नसल्याचे तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी सांगितले आहे.
कुडाळ तालुक्यातील तापसरीचा हा या वर्षातील दुसरा बळी गेला आहे. तापसरी आठवडाभरात आटोक्यात येणार असल्याचे यंत्रणेकडून सांगितले जात असले तरी तापसरीच्या रूग्णांची संख्या वाढती आहे. यामध्ये मुंबईहून आलेल्या रूग्णांची संख्या मोठी आहे.
तापसरीची साथ आटोक्यात आली असे वाटत असतानाच पुन्हा तापाचे रूग्ण वाढत आहेत. येथील रूग्णालयात डेंग्यु, मलेरियाचे रूग्ण आढळत असल्याने अद्यापही तापसरीचा धोका पूर्णत: टळलेला नसल्याचे चित्र दिसत आहे.
दक्षता घेणे आवश्यक
स्वाईन फ्लूचा पहिला रुग्ण २००९ मध्ये मेक्सिकोमध्ये आढळून आला. मात्र त्यानंतर अडीच महिन्यातच भारतात स्वाईन फ्लूचा रुग्ण आढळला. यावरून या रोगाचा फैलाव हवेवाटे जोरात होऊ शकतो. म्हणूनच यासाठी जास्तीत जास्त दक्षता घेणे आवश्यक आहे. तसेच स्वाईन फ्लूचे विषाणू सर्वसामान्य माणसातही आढळू शकतात.
फक्त त्यांची प्रतिकारशक्ती जास्त असल्यास त्याचा परिणाम होत नाही पण प्रतिकारशक्ती कमी असल्यास त्याचा परिणाम लगेच होऊ शकतो म्हणूनच ६ वर्षांच्या आतील बालके, वृद्ध माणसे, श्वसनाचा विकार असलेले, मधुमेह, उच्च रक्तदाब व गरोदर स्त्रियांना याचा प्रादुर्भाव होऊ शकतो. म्हणूनच त्यांनी खबरदारी बाळगणे आवश्यक आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, खोकताना, शिंकताना तोंडावर रुमाल ठेवणे व फ्लूूसारखी लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरकडे जाणे आवश्यक आहे.