कुडाळ बसस्थानकाच्या दुरूस्तीसाठी धडक

By admin | Published: August 28, 2015 11:14 PM2015-08-28T23:14:32+5:302015-08-28T23:14:32+5:30

आगारप्रमुखांना इशारा : विद्यार्थी जखमी झाल्यानंतरही एस. टी. प्रशासन सुस्तच?

Kudal rocks to repair bus station | कुडाळ बसस्थानकाच्या दुरूस्तीसाठी धडक

कुडाळ बसस्थानकाच्या दुरूस्तीसाठी धडक

Next

कुडाळ : धोकादायक ठरत असलेल्या कुडाळ एस. टी. बसस्थानकाच्या इमारतीची डागडुजी तत्काळ न केल्यास या स्थानकात एकही एस. टी. येऊ देणार नाही किंवा जाऊ देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी व कॉँग्रेस पक्षाच्यावतीने कुडाळ आगार व्यवस्थापकांना देण्यात आला. प्रवाशांच्या जीवनाशी खेळू नका, तत्काळ उपाययोजना करा, असा सल्लाही दिला.
कुडाळ एस. टी. स्थानकावर बसची वाट पाहत उभा असलेल्या ओमकार नाईक (रा. नेरुरपार ) या युवकाच्या डोक्यावर कुडाळ एस. टी. स्थानकाच्या इमारतीच्या स्लॅबचा काही भाग कोसळला होता. यामुळे ओमकार याच्या डोक्याला दुखापत झाली होती. या घटननेनंतर शुक्रवारी राष्ट्रवादी कॉँग्रेस व कॉँग्रेस पक्षाच्या कुडाळ तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी कुडाळ एस. टी. स्थानकात धडक दिली. बसस्थानकाच्या इमारतीची पाहणी करीत कुडाळ आगारचे व्यवस्थापक हरीष चव्हाण यांना मोडकळीस आलेल्या इमारतीबाबत अनेक प्रश्न विचारीत धारेवर धरले.यावेळी राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य अमित सामंत, कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिनेश साळगावकर, कॉँग्रेस उपतालुकाध्यक्ष रुपेश पावसकर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ युवक कॉँग्रेसचे अध्यक्ष आनंद शिरवलकर, राष्ट्रवादीचे भास्कर जाधव, संग्राम सावंत, बाळ कनयाळकर, लालू पटेल, साबा पाटकर, कॉँग्रेसचे अनिल कुपकर, दाजी गोलम, राष्ट्रवादी व काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी आगार व्यवस्थापक हरीष चव्हाण यांना अमित सावंत यांनी या इमारतीच्या नूतनीकरणाबाबत प्रस्तावाचे काय केले ते सांगा, असा प्रश्न केला. यावर चव्हाण यांनी आम्ही येथील इमारतीच्याबाबत नेहमीच प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर पाठवित असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी काँग्रेसचे आनंद शिरवलकर यांनीही आपण कोणत्या उपाययोजना करणार ते आम्हाला कळवा. अन्यथा आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा दिला. रूपेश पावसकर यांनी जखमी विद्यार्थ्याचा सर्व रूग्णालय व औषधोपचाराचा खर्च एस. टी. प्रशासनाने द्यावा,असे अधिकाऱ्यांना सांगितले. ही अट एस. टी.चे चव्हाण यांनी मान्य केली.
यावेळी एस. टी. प्रशासनाचे राम वाडकर व इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. येथील इमारतीच्या धोकादायक ठरत असलेल्या बांधकामाबाबत तत्काळ उपायोजना करू, असे आश्वासन चव्हाण यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिले. (प्रतिनिधी)


अधिकाऱ्यांकडून जखमीची चौकशीही नाही
जखमी विद्यार्थ्यावर कुडाळ ग्रामीण रू ग्णालयात उपचार केल्यानंतर त्याची विचारपूस करण्यासाठी एस. टी. प्रशासनाचा प्रतिनिधी त्याच्या घरी जाणे आवश्यक होते. मात्र, कोणीही अधिकारी, कर्मचारी त्याच्या घरी विचारपूस करण्याकरिता न गेल्याची माहिती या चर्चेदरम्यान मिळाली.

एस. टी. बस जाऊ देणार नाही : सामंत
या बसस्थानकाची दुरूस्ती किंवा नुतनीकरण लगेच होऊ शकत नाही. हे खरे असले, तरी येथील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तत्काळ याठिकाणी जाळ्या लावा. तसेच सूचना फलक व इतर उपाययोनजा करा, अन्यथा एस. टी. बस यापुढे जाऊ देणार नाही, असे अमित सामंत यांनी सांगितले.

Web Title: Kudal rocks to repair bus station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.