कुडाळला वादळाचा तडाखा
By admin | Published: July 10, 2016 11:41 PM2016-07-10T23:41:33+5:302016-07-10T23:41:33+5:30
महामार्गावर झाडे पडल्याने वाहतूक ठप्प : अणाव रमाईनगरात घर जमीनदोस्त
कुडाळ : शनिवारी मध्यरात्री कुडाळ तालुक्यात झालेल्या जोरदार चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी झाडांची पडझड होऊन काहींच्या घरांचे नुकसान झाले. कुडाळ येथील महामार्गावर झाडे कोसळल्यामुळे वाहतूक काही वेळ ठप्प होती.
गेले दोन ते तीन दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने कुडाळ तालुक्यात रविवारी मध्यरात्री जोरदार वादळी वाऱ्यासह हजेरी लावली. मुसळधार पावसाबरोबरच काहीवेळ झालेल्या चक्रीवादळाचा फटका तालुक्यातील बऱ्याच गावांना सहन करावा लागला.
अणाव-शेळणवाडी येथील चंद्रकांत परब यांनी गुरे बांधलेल्या मांगराची भिंत कोसळल्याने या मांगरातील गुरे जखमी झाली. गुरांच्या हंबरण्यामुळे जागे झालेल्या परब कुटुंबियांनी लागलीच गुरांना सुरक्षितस्थळी हलविले.
कुडाळात काहीवेळ झालेल्या चक्रीवादळामुळे कुडाळ येथील सत्यम हॉटेलसमोरील महामार्गावर सुरूचे झाड कोसळल्याने रविवारी मध्यरात्री महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प होती. वर्दे-खालची पालववाडी येथील नळयोजनेच्या शेडचे पत्रे उडून गेल्याने नळयोजनेचा स्टार्टर व रेग्युलेटरमध्येही बिघाड झाल्याने
सुमारे दहा हजारांचे नुकसान
झाले.(प्रतिनिधी)
कुडाळ-आंबेडकरनगर येथे पूरस्थिती
४रविवारी रात्री संपूर्ण तालुक्यात मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे भंगसाळ नदीला रात्री पूर आला. पुराचे पाणी नजीकच्या डॉ. आंबेडरकरनगर येथील परिसरात घुसून रहिवाशांची धावपळ उडाली. सकाळी पुराचे पाणी ओसरले.
४अणाव-रमाईनगर येथील अनिता जाधव या वृद्ध महिलेने इंदिरा आवास योजनेतून घर बांधले आहे. रविवारी मध्यरात्रीच्या वादळामुळे तिच्या घरावर चिंचेचे मोठे झाड पडून पूर्ण घरच जमीनदोस्त झाले. झाड कोसळण्याच्या आवाजाने जाधव यांनी घरातून बाहेर पळ काढल्याने त्या बचावल्या. अनिता जाधव या घरात एकट्याच राहत असून, झाड कोसळल्याने त्यांच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे.