कुडाळ तालुक्यात ५० शाळांमध्ये गॅस योजना राबविणार
By admin | Published: December 24, 2015 10:20 PM2015-12-24T22:20:11+5:302015-12-25T00:04:20+5:30
कुडाळ पंचायत समिती सभा : कुडाळ-शिर्डी बस पूर्ववत करण्याची मागणी
कुडाळ : गेले दीड महिने सुरु असणारी कुडाळ - शिर्डी एस. टी. भारमान नसल्याच्या कारणावरून बंद करण्यात आली. ही गाडी सकाळच्या सत्रात लवकरच पूर्वरत करावी, अशी मागणी पंचायत समिती सदस्यांनी केली. कुडाळ तालुक्यातील ५० शाळांमध्ये जिल्हा परिषदेची गॅस योजना राबविण्यात येणार आहे. घावनळे गावाच्या विकासासाठी पंचायत समितीच्या अर्थसंकल्पातून १ लाख रुपये देण्याचे जाहीर करण्यात आले.
कुडाळ पंचायत समितीची डिसेंबर २०१५ ची मासिक सभा बुधवारी घावनळे ग्रामपंचायत येथे झाली. यावेळी सभापती प्रतिभा घावनळकर, उपसभापती आर. के. सावंत, गटविकास अधिकारी व्ही. एम. नाईक, सरपंच महादेव जाधव, माजी बांधकाम सभापती आबा मुंज, भारती चव्हाण, पंचायत समिती सदस्य विविध खात्याचे प्रतिनिधी उपस्थित होते.
सभेमध्ये कुडाळ शिर्डी गाडीचा विषय आला. दीड महिन्यापूर्वी दिमाखात कुडाळ-शिर्डी गाडी सुरु करण्यात आली. ही गाडी भारमान नसल्याच्या कारणावरून दोन दिवसांपूर्वी बंद करण्यात आली. याबाबत सदस्य अतुल बंगे यांनी प्रश्न उपस्थित केला असता आगार प्रमुख हरेश चव्हाण यांनी ही गाडी प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात आली. दीड महिन्यात भारमान नसल्याने बंद केली. तुमच्या मागणीचा विचार करून भविष्यात ही गाडी सकाळच्या सत्रात सुरु करण्याचा पयत्न केला जाईल असे चव्हाण यांनी सांगितले. याबाबत आंदोलन करण्याची वेळ येवू नये असे बंगे यांनी सूचित केले.
शिक्षण विभागाचा तालुकास्तरीय क्रीडा महोत्सव साळगाव येथे २९ व ३० रोजी होणार आहे. जिल्हा पातळीवरून शाळांना गॅस पुरवठा योजना कार्यान्वित करायची आहे. तालुक्यात ५० शाळांमध्ये ही योजना राबविण्यात येणार आहे. ज्या शाळांची पटसंख्या अधिक आहे त्याचा प्राधान्याने विचार केला जाईल असे सांगण्यात आले.
याबाबत १७ ही सदस्यांना विश्वासात घेवून कार्यवाही करावी असे सदस्य दीपक नारकर यांनी सूचित केले. समाजकल्याण विभागाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील लाभार्थ्यांना मिळावा अशी मागणी सदस्य बबन बोभाटे यांनी केली. वागदे येथे सुरु होणाऱ्या राज्यस्तरीय सिंधु पशुपक्षी प्रदर्शनाला सर्व सदस्यांसह शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे. विविध भागातील विविध जातीची दुग्धजन्य जनावरे इतर पशुपक्षी या प्रदर्शनात सहभागी झाले आहेत, अशी माहिती कृषी अधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांनी दिली.
प्रदर्शनात कृषीनिमित्त विविध स्टॉल असून माती परीक्षण करण्यासाठी राज्यपातळीवरील तज्ज्ञ आहेत. १४ व्या वित्त आयोगाचा निधी ग्रामपंचायत पातळीवर जानेवारीपर्यंत पोचणार आहे. शासनाचा अपंगनिधी, मागासवर्गीयांना विविध लाभ मिळण्यासाठी फारच विलंब लागतो हे सर्व विषय जिल्हा पातळीवरून विलंबाने येत असल्याने लाभार्थी वंचित राहतो. भविष्यात अशी परिस्थिती उद्भवू नये, तालुक्यातील छोट्या व मध्यम स्वरूपाच्या ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या अडचणीत असतील त्यांना सक्षम करावे, अशी मागणी सदस्य किशोर मर्गज यांनी केली. (प्रतिनिधी)
घावनळे गावासाठी १ लाखाचा निधी जाहीर
ज्या गावात पंचायत समितीची सभा असते त्याठिकाणी अर्थसंकल्पातील निधी दिला जातो. त्या अनुषंगाने घावनळे गावासाठी १ लाखाचा निधी देण्याचे सर्वानुमते जाहीर करण्यात आले. १ जानेवारीला नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पंचायत समितीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.