Kudal Vidhan Sabha Election 2024: पुत्राने काढला वडिलांच्या पराभवाचा वचपा, राणेंनी पुनश्च मिळविला बालेकिल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 06:42 PM2024-11-25T18:42:08+5:302024-11-25T18:43:01+5:30
संदीप बोडवे मालवण: जिथून नारायण राणे यांच्या कोकणातील राजकारणाची सुरुवात झाली त्या मालवण मध्येच त्यांचा वैभव नाईक यांनी केलेला ...
संदीप बोडवे
मालवण: जिथून नारायण राणे यांच्या कोकणातील राजकारणाची सुरुवात झाली त्या मालवण मध्येच त्यांचा वैभव नाईक यांनी केलेला पराभव हा राणे परिवाराच्या जिव्हारी लागला होता. या पराभवाचा वचपा काढण्यासाठीच नारायण राणे यांचे पुत्र माजी खा. निलेश राणे मालवण कुडाळ मतदार संघातून विधानसभेच्या रिंगणात उतरलेले होते. निलेश राणे यांनी या निवडणुकीत माजी आमदार वैभव नाईक यांचा पराभव करत वडिलांच्या पराभवाची परतफेड तर केलीच आहे परंतु मालवणवरही पुनश्च वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
१९९० पासून मालवण म्हणजे राणे असे समीकरण बनले होते. परंतु मागील दहा वर्षात याला तडा गेला होता. हे शल्य उराशी बाळगणाऱ्या निलेश राणे यांनी या मतदार संघात बांधणी करायला सुरुवात केली होती. कोणत्याही परिस्थितीत मालवण कुडाळ मधून वैभव नाईक यांच्या विरोधात निवडणुकीला उभे राहून त्यांचा पराभव करायचा असा चंगच निलेश राणे यांनी बांधला होता.
मालवण मध्ये राणे विरुद्ध नाईक असाच संघर्ष पहावयास मिळाला. नारायण राणे यांचा येथे वैभव नाईक यांनी केलेला पराभव आणि त्याची परतफेड अशी किनार या निवडणुकीला मिळाली होती. राजकीय विरोधक असलेल्या वैभव नाईक यांच्या मागील दहा वर्ष हातात गेलेला मालवण तालुका पुन्हा एकदा मिळविणे राणेंसाठी सोपे नव्हते. दहा वर्षांच्या वैभव नाईक यांच्या आमदारकीच्या कारकीर्दीत साडेसात वर्ष त्यांना सत्तेची मिळाली होती. नाईक यांनी याच जोरावर मालवण वर आपली पकड अधिक मजबूत केली होती.
नाईक कुठे कमी पडले..
- मालवण ते देवबाग पर्यंत बंधाराकम रस्ता करू शकले नाहीत
- उद्योगाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेला सी वर्ल्ड प्रकल्पासंदर्भात बोट चेपे धोरण स्वीकारणे.
- जल पर्यटनासाठी विराट युद्ध नौका समुद्रात प्रस्थापित करण्याच्या प्रकल्पाला प्रतिकुलता दर्शविणे.
- मालवण मध्ये पर्यटनाला मोठा वाव असताना पर्यटनासाठी ठोस काम न करणे.
- स्वदेश दर्शन योजनेत लक्ष घालून प्रभावी कामं करून न घेणे.
- विकासापेक्षा भावनिक राजकारणावर जास्त लक्ष केंद्रित करणे.
- आश्वासन देवूनही मालवण बस स्थानकाचे काम पूर्ण न करणे.
राणे यांच्या जमेची बाजू
- तरुणांमध्ये आपले नेतृत्व निर्माण करण्यात राणे यशस्वी.
- पर्यटन व्यवसायिकांमध्ये आश्वासकता निर्माण करण्यात यश.
- मालवणच्या ग्रामीण भागात पकड असलेल्या दत्ता सामंत यांना आपल्या प्रचारात ऐनवेळी सक्रिय करणे.
- सर्वसामान्यांशी नाळ असलेला धोंडी चिंदरकर यांच्या सारखा तालुका अध्यक्ष लाभणे.
मालवण तालुक्यातून मताधिक्य
निलेश राणे यांना मालवण तालुक्यातून ४५५३ मतांनी आघाडी मिळाली. तर मालवण नगर परिषदेमध्ये १३५ चे मताधिक्य मिळाले.