कुडाळचा पहिला नगराध्यक्ष भाजपचाच
By admin | Published: April 15, 2016 10:13 PM2016-04-15T22:13:22+5:302016-04-15T23:33:31+5:30
माधव भांडारी : जाहीर प्रचार सभा
कुडाळ : आमच्या भाजप पक्षाला केंद्रात व राज्यात ज्याप्रमाणे मतदारांनी साथ दिली त्याचप्रमाणे कुडाळचा विकास करण्यासाठी येथील मतदारांनी भाजपला साथ द्यावी, विकास करून घ्यावा, असे आवाहन भाजपचे मुख्य प्रदेश प्रवक्ते माधव भांडारी यांनी कुडाळ येथील जाहीर प्रचार सभेत केले. तसेच कुडाळचा पहिला नगराध्यक्ष हा भाजपचाच होणार असून ही निवडणूक जिल्ह्याचा टर्निंग पॉईट ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले.कुडाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी कुडाळ येथे जाहीर प्रचार सभेचे आयोजन गुरुवारी सांयकांळी पाच वाजता आयोजन करण्यात आले होते. सभेला भाजपचे मुख्य प्रदेश प्रवक्ते माधव भांडारी व आमदार रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सभा झाली. भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, राज्य सरचिटणीस राजन तेली, माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हा प्रवक्ते काका कुडाळकर, तालुकाध्यक्ष बब्रुवान भगत, नीलेश तेंडुलकर, सर्फराज नाईक, तसेच उमेदवार व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना भांडारी म्हणाले की, कुडाळचा पहिला नगराध्यक्ष हा भाजपचाच होणार आहे, मात्र कुडाळवासियांनी आम्हाला कोणाची मदत घेण्याची वेळ यायला देऊ नका, असे आवाहन ही केले.यापुढे जिल्हा परिषद व पंचायत समितीवर भाजपचीच सत्ता येणार असून, आम्ही त्याची तयारी देखील सुरू केली आहे. आता यापुढे आम्ही कोणाचीच मदत घेणार नसल्याचेही सांगितले, अशी माहिती पत्रकार परिषदेत दिली. (प्रतिनिधी)
युती विधानसभेनंतर तुटली : भांडारी
या ठिकाणी भाजप स्वतंत्र लढत आहे. तसेच यापुढच्या सर्व निवडणुकांमध्ये ही स्वतंत्र लढणार आहे. शिवसेनेसोबत असलेली युती ही विधानसभेनंतर तुटली असल्याचेही भांडारी यांनी सांगत ‘एकला चलो रे ची’ री ओढली आहे. आमचा पक्ष हा माजी आमदारांचा पक्ष आहे, असे म्हणणारे कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत, ते माजीच राहतील, असा टोला भांडारी यांनी नारायण राणे यांना लगावला.
यावेळी बोलताना आमदार रवींद्र चव्हाण म्हणाले की, केंद्र व राज्य सरकारने कोकणाला झुकते माप दिले, असून कोकणाच्या सर्वांगीण विकासासाठी आमचे सरकार प्रयत्न करीत आहे.