कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रोत्सवास उद्यापासून होणार प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 07:39 PM2018-02-12T19:39:03+5:302018-02-12T19:43:09+5:30

शिवभक्तांची मांदियाळी ठरलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वरच्या महाशिवरात्री यात्रोत्सवास उद्यापासून मोठ्या दिमाखात सुरुवात होत आहे. कुणकेश्वरचा यात्रोत्सव तळकोकणात होणाऱ्या प्रमुख उत्सवांमधील महत्त्वाचा यात्रोत्सव मानला जातो. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर या जिल्ह्यांबरोबरच संपूर्ण महाराष्ट्रतील व लगतच्या कर्नाटक व इतर राज्यांतील भाविकही मोठ्या प्रमाणावर येथे उपस्थिती लावतात.

Kukeshwar Mahashivaratri Yatra will start from tomorrow | कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रोत्सवास उद्यापासून होणार प्रारंभ

कुणकेश्वर यात्रोत्सवातील समुद्रस्नान आणि धार्मिक कार्यक्रमांसाठी किनाऱ्यांवर असे मंडप उभारण्यात आले आहेत.

Next

कुणकेश्वर : शिवभक्तांची मांदियाळी ठरलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वरच्या महाशिवरात्री यात्रोत्सवास उद्यापासून मोठ्या दिमाखात सुरुवात होत आहे. कुणकेश्वरचा यात्रोत्सव तळकोकणात होणाऱ्या प्रमुख उत्सवांमधील महत्त्वाचा यात्रोत्सव मानला जातो. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर या जिल्ह्यांबरोबरच संपूर्ण महाराष्ट्रतील व लगतच्या कर्नाटक व इतर राज्यांतील भाविकही मोठ्या प्रमाणावर येथे उपस्थिती लावतात.

यावर्षी यात्रोत्सव १३ ते १५ फेब्रुवारी असा तीन दिवस असल्याने तसेच अमावस्या संपूर्ण दिवसभर असल्याने पवित्र स्नानासाठी देवस्वाऱ्या, भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार आहे. यादृष्टीने देवस्थान कमिटी व प्रशासन यांनी नियोजन केले आहे.

यात्रास्थळी भाविकांना येण्यासाठी प्रशासनाने एसटीचा ताफा सज्ज ठेवला असून देवगड आगारातून विविध ठिकाणांहून तब्बल २८ गाड्या सोडण्यात येणार आहेत. त्यामध्ये मुंबई, कणकवली रेल्वे स्टेशन, देवगड आदी महत्त्वाच्या ठिकाणांहून विशेष गाड्यांची सोय करण्यात आली आहे.

कुणकेश्वरकडे येणाऱ्या रस्त्यांच्या डागडुजीची कामे अद्यापही अपूर्णच आहेत. बऱ्याच ठिकाणी रस्ते नादुरुस्त असून साईडपट्ट्याही पूर्ण करण्यात आलेल्या नाहीत. रस्त्यावरील वाढलेल्या झाडीची कामेही काही ठिकाणी अर्धवट स्थितीत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. कुणकेश्वरक्षेत्री दाखल होणाऱ्या देवस्वाऱ्यांची व त्यांच्यासोबत येणाºया लवाजम्याच्या योग्य सोयीसुविधांची उपाययोजना ट्रस्टच्यावतीने करण्यात आली आहे.

समुद्रस्नानासाठी समुद्रकिनारी पुरुष व स्त्रियांसाठी स्वतंत्र चेंजिंगरुमची व्यवस्था करण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थितीत भाविकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचविण्यासाठी संपूर्ण यात्रा परिसराचा नकाशा फ्लेक्स बोर्डमध्ये ठिकठिकाणी लावण्यात आलेला आहे. यात्रा परिसरात भाविकांसाठी मार्गदर्शक फलकही लावण्यात आले आहेत.

श्री देव कुणकेश्वराच्या भेटीसाठी श्री स्वयंभू रवळनाथ देवस्थान (कणकवली), श्री आरेश्वर-पावणादेवी देवस्थान (आरे), श्री देव रवळनाथ (वायंगणी), श्री जैन पावणादेवी देवस्थान (हुंबरठ-कणकवली), श्री देव गांगेश्वर पावणादेवी (बावशी) या देवस्वाऱ्या येणार आहेत. इतर देवस्वाऱ्यांनी नियोजनाच्या दृष्टीने देवस्थान ट्रस्टशी संपर्क साधावा, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

यात्रेकरुंसाठी पोलीस प्रशासन सज्ज

४भाविकांना वाहतुकीस अडथळा होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाकडून एकेरी वाहतूक, पार्किंगचे नियोजन केले आहे. त्यात यात्रा कालावधीत वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. तसेच सर्व मार्गावर ठिकठिकाणी चौक्या व पोलीस पथके तैनात करण्यात येणार आहेत. त्यामुळे भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नसुद्धा सुटणार आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस दल, राखीव पोलीस दल विशेष मेहनत घेत आहेत. अन्न प्रशासन विभागामार्फत यात्रेमधील सर्व हॉटेल, स्टॉलमधील खाद्यपदार्थांची तपासणी करण्यात येणार आहे. कुणकेश्वर यात्रोत्सवानिमित्त तीन दिवस देशभराच्या कानाकोपऱ्यातून शिवभक्त मोठ्या संख्येने हजेरी लावणार आहेत. येणाऱ्या लाखो शिवभक्तांना चांगल्या सुविधा देण्यासाठी प्रशासनाच्या साथीने देवस्थान कमिटीने सुयोग्य नियोजन केले आहे.
 

Web Title: Kukeshwar Mahashivaratri Yatra will start from tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.