कुणकेश्वर दर्शनास अलोट गर्दी
By admin | Published: February 18, 2015 12:47 AM2015-02-18T00:47:43+5:302015-02-18T00:47:43+5:30
यात्रोत्सव सुरू : आज देवस्वाऱ्यांचे समुद्रस्नान, समुद्रकिनारा फुलला
कुणकेश्वर : दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व लाखोंची उपस्थिती लाभणाऱ्या महाशिवरात्री उत्सवाला शिवनामाच्या गजरात भल्या पहाटे कुणकेश्वर पूजनाने सुरुवात झाली. पारंपरिक पूजेनंतर शासकीय पूजा पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते पार पडली. मध्यरात्री १२ वाजल्यापासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. रात्री उशिरापर्यंत लाखो भाविकांनी कुणकेश्वराचे दर्शन घेतले. दोन दिवस चालणाऱ्या या यात्रोत्सवाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक उपस्थित राहणार आहेत.
या पूजेवेळी जिल्हाधिकारी ई. रवींद्रन, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, प्रांताधिकारी संतोष भिसे, उद्योगपती नंदूशेठ घाटे, सिद्धिविनायक ट्रस्टचे माजी अध्यक्ष सुभाष मयेकर, शिवसेना देवगड तालुका अध्यक्ष विलास साळसकर, तहसीलदार जीवन कांबळे, नायब तहसीलदार अशोक शेळके, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, सरपंच दीपिका मुणगेकर, राष्ट्रवादी तालुका महिला अध्यक्षा नयना आचरेकर, मुंबई नगरसेवक सुनील जाधव, देवस्थान अध्यक्ष प्रभाकर पेडणेकर, ग्रामस्थ व देवस्थान कमिटी सदस्य उपस्थित होते.
यात्रेच्या दुसऱ्या दिवशी पूर्ण दिवस अमावास्या असल्यामुळे पवित्र समुद्रस्नानास भाविकांची गर्दी वाढल्याचे चित्र आज दिसत होते. कुणकेश्वराच्या दर्शनानंतर सागरतीर्थाचा लाभ घेण्यासाठी भाविक सागरकिनारी जात असल्याने संपूर्ण किनारा गर्दीने फुलून गेला होता.
देवस्थान कमिटीच्या स्थानिक स्वयंसेवकांमार्फत भाविक व प्रशासनाला योग्य ते सहकार्य दिले जात होते. कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या जनरेटरमुळे विद्युत महामंडळाच्या सहकार्यामुळे विद्युत पुरवठा सुरळीत होता. मालवणच्या दिशेने येणाऱ्या भाविकांच्या वाहनांच्या पार्किंगची सोय मंदिरानजीकच केली होती. यात्रोत्सव कालावधीत विविध देवस्वाऱ्या श्री दर्शनाचा व समग्र पवित्रस्नानाचा लाभ घेणार आहेत. यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकर पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंसेवक व प्रशासन विशेष मेहनत घेत आहेत. लहान मुलांची खेळणी, तयार कपड्यांची दुकाने, विविध शेती व गृहोपयोगी साहित्य आदी व्यापाऱ्यांची उपस्थिती लक्षणीय होती. श्री चरणी अर्पण करण्यासाठी बेल, श्रीफळ आदींची विक्री मोठ्या प्रमाणावर होत होती.यावेळी ‘श्रीं’च्या प्रसादाचे स्वरूप ड्रायफ्रुट्स, बुंदी अशा स्वरूपात होते. (वार्ताहर)
नियोजित दर्शनरांगा
भक्त निवासासमोरील नवीन दुमजली इमारतीतील सुनियोजित दर्शनरांगांमुळे गर्दीवर नियंत्रण मिळविणे सहज शक्य होत होते. पोलीस प्रशासनामार्फत यात्रा परिसरात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
तसेच अध्यक्ष व सदस्य सर्व व्यवस्थेवर जातीने लक्ष ठेवून होते. यात्रा परिसरातील व रांगेतील भाविकांना थेट प्रक्षेपणामुळे शिवदर्शनाचा लाभ घेता येत होता.
लोकप्रतिनिधींकडून दर्शन
दुपारच्या सत्रात शिवसेना खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, माजी आमदार प्रमोद जठार, जयदेव कदम, संतोष किंजवडेकर आदींनी कुणकेश्वराचे दर्शन घेतले. सायंकाळी उशिरा आमदार नीतेश राणे, जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, देवगड राष्ट्रीय काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रकाश राणेश, आदींनी कुणकेश्वराचे दर्शन घेतले.