भाट्ये बीचवर रंगला विद्यार्थ्यांचा कुंभमेळा

By admin | Published: January 19, 2015 11:12 PM2015-01-19T23:12:11+5:302015-01-20T00:06:02+5:30

चिमुकल्यांचा शिल्पाविष्कार : वाळू शिल्प अभ्यासातून विद्यार्थ्यांनी दिला मूर्तिमंत कलेचा आस्वाद

Kumbh Mela of Bhatia beach students | भाट्ये बीचवर रंगला विद्यार्थ्यांचा कुंभमेळा

भाट्ये बीचवर रंगला विद्यार्थ्यांचा कुंभमेळा

Next

रत्नागिरी : चिमुकल्या हातानी वाळूचे छोटे छोटे ढीग तयार करणे, त्यांना विविध आकार देणे, वाऱ्याने व उन्हाने वाळू उडू नये, यासाठी पाण्याचा स्पे्र फवारणे, रांगोळीे किंवा रंग वापरून रेखाटलेल्या शिल्पाला सुशोभित करण्याचा प्रयत्न सुरू होता. मध्येच शिक्षकदेखील विद्यार्थ्यांना मदत करताना दिसत होते. निमित्त होते अभ्यासजत्रेचे. भाट्ये बीचवर जणू विद्यार्थ्यांचा कुंभमेळाच आयोजित केला असल्याचे एकंदर गर्दीवरून दिसून येत होते.
विद्यार्थ्यांना ज्ञान, रचनावादी दृष्टीकोनातून कृतीद्वारा व अनुभवाधिष्ठीत शिक्षण मिळावे, यासाठी भाट्ये येथील निसर्गाच्या सानिध्यात नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपयोग करुन कृतीव्दारा दालने उभारण्यात आली होती. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा प्रयोग प्रथमच करण्यात आला असल्याने जिल्हाभरातून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विद्यार्थी, पालक, शिक्षकांनी एकत्रित येऊन विविध विषयांवरील रेखाटलेली वाळू शिल्प लक्ष वेधून घेत होती.
लोकमान्य टिळक, विनायक दामोदर सावरकर आदि लोकनेते अंधश्रध्दा निर्मूलन, शिक्षणाचे महत्त्व, भारत माता, ग्रहमंडळ, मंगलयान, रत्नागिरी जिल्हा, प्रचितगड, स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा, स्वच्छ भारत सुंदर भारत, व्हेल मासा, ए टू झेड वर्णमाला, झाडे लावा झाडे जगवा, पानांचे अंतरंग, व्यसनाचे दुष्परिणाम आदी विविध विषयांवर वाळूपासून सुरेख शिल्प रेखाटण्यात आली होती. दुपारचे तीव्र ऊन व वाऱ्यामुळे वाळू उडून जाऊ नये, याकरिता शिक्षक, विद्यार्थी अधूनमधून शिल्पावर पाणी फवारताना दिसत होते.
याशिवाय काही विद्यार्थ्यांनी खाद्य पदार्थ, तर कुणी पुस्तक विक्री, हस्तकलेच्या विविध वस्तू विक्रीचे स्टॉल्स लावले होते. काही विद्यार्थ्यानी तर स्वत: काढलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन मांडले होते. काही विद्यार्थ्यांनी तर चक्क केळी, नारळ विक्रीला ठेवली होती. सकाळपासून भाट्ये किनारा गर्दीने फुलला होता.
सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या पतंग महोत्सवात विद्यार्थी, पालक, शिक्षक सहभागी झाले होते. आकाशात उंच पतंग उडविण्याची मजा विद्यार्थ्यांनी घेतली. भाट्ये येथे बीचवर विद्यार्थ्यांनी साकारलेल्या या अनबळÞ शिल्पाला अनेकांनी दाद दिली. या शिल्पातून सामाजिक विषमतेवर प्रकाश झोत टाकण्यात आला. क्रांतिकारकांच्या स्मृतीही जपल्या गेल्या. सांस्कृतिक ्आदानप्रदान करणारी शिल्पेही यावेळी साकारण्यात आली. या ठिकाणी परिसरातील पर्यटनप्रेमीनी भेट दिली व शिल्पकारांचे कौतुक केले. (प्रतिनिधी)


विद्यार्थी रमले शिल्पविश्वात
विद्यार्थी रमले ज्ञान, रचनावादी अनुभव विश्वात.
विविध वस्तूंमधून रेखाटलेल्या शिल्पानी लक्ष वेधले.
नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करून राज्यात प्रथमच कृतीद्वारा वाळू शिल्प.

Web Title: Kumbh Mela of Bhatia beach students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.