कुणकेश्वरचरणी अलोट गर्दी
By Admin | Published: February 26, 2017 12:21 AM2017-02-26T00:21:15+5:302017-02-26T00:21:15+5:30
आज तीर्थस्नानाची पर्वणी; लाखो शिवभक्तांनी घेतले दर्शन
कुणकेश्वर : दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि महाशिवरात्री उत्सवानिमित्त तीन दिवस चालणाऱ्या यात्रोत्सवाला शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. सलग सुट्या आल्याने शनिवारी या यात्रेला भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली आहे. तीन दिवस चालणाऱ्या यात्रोत्सवात तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी अमावास्या असल्याने तीर्थस्नानासाठी भाविकांची मोठी गर्दी होईल तसेच सायंकाळी मोड यात्रेने समारोप होणार आहे.
शनिवार आणि रविवार सलग दोन दिवस सुटी असल्याने शिवभक्तांनी गर्दीचा उच्चांक केला होता. सलग सुट्यांमुळे जिल्ह्यासह राज्यभरातील भक्तांनी मोठ्या संख्येने कुणकेश्वर क्षेत्री गर्दी केली आहे. महसूल विभाग, सनातन संस्था, दंतचिकित्सा शिबिर अशासारख्या विविध स्टॉलमधील सेवांचा भाविकांनी लाभ घेतला. समुद्रकिनाऱ्यानजीक रस्ता व पार्किंगची व्यवस्था असल्याने आबालवृद्धांची गैरसोय झाली नाही. मंदिर व परिसरातील आकर्षक फुलांची सजावट व परिसरातील विद्युत रोषणाईने भाविकांचे लक्ष वेधून घेतले.
बाजारपेठेतही मोठ्या प्रमाणावर उलाढाल होत आहे. त्यामध्ये मालवण खाजा, कलिंगड खरेदीकडे भाविकांचा कल मोठ्या प्रमाणावर दिसून येत होता. समुद्रकिनारी मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत. त्यामध्ये भाविकांनी घोडा व उंट सफर करण्याची मजा अनुभवली. क्लोज सर्किट कॅमेऱ्यामुळे यात्रा परिसर व समुद्रकिनारा नजरेखाली ठेवण्यात प्रशासनाला यश आले आहे. तसेच एलईडी स्क्रीन व ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून यात्रेचे विहंगम दृश्य भाविकांना पाहता येत आहे.
देवगड, विजयदुर्ग, मालवण, कणकवली आदी एस. टी. आगारामार्फत या यात्रेसाठी खास एस. टी.ची सोय करण्यात आली होती. हॅम रेडिओप्रणाली, पोलिस प्रशासन यांच्यामुळे हरविलेल्या व्यक्तींचा सहज शोध घेता येणे शक्य झाले. हॉटेल व इतर स्टॉलधारकांकडून निर्माण होणारा कचरा देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या गाड्यांकडून वेळोवेळी गोळा करून संपूर्ण यात्रा परिसर स्वच्छ ठेवण्यात येत होता. कुणकेश्वरकडे येणाऱ्या मार्गामध्ये सुयोग्य बदल केल्यामुळे वाहतूक व्यवस्थाही सुरळीत होती.
जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर, माजी खासदार भालचंद्र मुणगेकर, अतुल रावराणे, संदेश पारकर आदींचा श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टच्यावतीने यावेळी सत्कार करण्यात आला. रविवारी अमावास्या असल्याने भाविकांना तीर्थस्नानाचा लाभ घेता येणार आहे. यात्रोत्सव मोड यात्रेपर्यंत असाच सुरू राहणार आहे. (वार्ताहर)