युतीतील कुरबुरी लवकरच दूर होतील: सुभाष देसाई यांचे सूतोवाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 11:44 AM2019-03-16T11:44:12+5:302019-03-16T11:46:40+5:30

सर्व पदाधिकारी एकदिलाने निवडणूक प्रचारामध्ये सक्रीय झालेले दिसतील. शिवसेना - भाजप युतीमध्ये काही कुरबुरी असतील तर त्या लवकरच दूर होतील. असे सूतोवाच शिवसेना नेते तथा उद्योगमंत्री मंत्री सुभाष देसाई यांनी येथे केले.

Kuruburi in the alliance will soon be removed: Subhash Desai's sonata | युतीतील कुरबुरी लवकरच दूर होतील: सुभाष देसाई यांचे सूतोवाच

कणकवली येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मार्गदर्शन केले. (अनिकेत उचले )

Next
ठळक मुद्देयुतीतील कुरबुरी लवकरच दूर होतील: सुभाष देसाई यांचे सूतोवाच  कणकवलीत शिवसेनेची बैठक

कणकवली : सिंधुदुर्ग - रत्नागिरी जिल्ह्यातील भाजप व महायुतीमधील इतर काही घटक पक्ष नाराज असले तरी त्यांची समजूत काढण्याचे काम वरिष्ठ पातळीवर सुरू आहे. पुढील काही दिवसांत शिवसेनेसोबत भाजप,आरपीआय आदींचेही झेंडे एकत्रितपणे पहायला मिळतील.

तसेच सर्व पदाधिकारी एकदिलाने निवडणूक प्रचारामध्ये सक्रीय झालेले दिसतील. शिवसेना - भाजप युतीमध्ये काही कुरबुरी असतील तर त्या लवकरच दूर होतील. असे सूतोवाच शिवसेना नेते तथा उद्योगमंत्री मंत्री सुभाष देसाई यांनी येथे केले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विद्यमान खासदार विनायक राऊत यांच्या उमेदवारीला विरोध दर्शविला आहे. तसेच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत आपल्या भावना पोहोचविल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कणकवली येथे विजय भवनमध्ये शिवसेनेच्या रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खासदार , आमदार , जिल्हाप्रमुख तसेच अन्य प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, सुधीर मोरे, आमदार वैभव नाईक, आमदार राजन साळवी, आमदार सदानंद चव्हाण, रत्नागिरी जिल्हाप्रमुख सचिन कदम, विलास चाळके, सावंतवाडी विधानसभा संपर्कप्रमुख शैलेश परब, कुडाळ मतदारसंघ संपर्कप्रमुख सुरेश पाटील, रत्नागिरी नगराध्यक्ष राहुल पंडित, प्रदीप बोरकर, सचिन सावंत, राजू राठोड, गीतेश कडू, हरी खोबरेकर, नागेंद्र परब, मंगेश लोके , शैलेश भोगले, प्रथमेश सावंत आदी उपस्थित होते.

यावेळी मंत्री सुभाष देसाई म्हणाले, शिवसेना - भाजपची युती झाली आहे. २३ मतदारसंघातून शिवसेना तर २५ मतदारसंघातून भाजप लोकसभा निवडणूक लढवीत आहे. दोन्ही पक्षाना एकमेकांची गरज आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच मुख्यमंत्री देवैंद्र फडणवीस युतीमध्ये समन्वय साधत आहेत. त्यामुळे पूर्वीपेक्षा युती सक्षम झाली असून एकजुटीचा संदेश या निवडणुकीत कार्यकर्ते देणार आहेत.

भाजप नेते बंदर विकास मंत्री रवींद्र चव्हाण यांची व माझी सविस्तर चर्चा दररोज होत असते. लवकरच शिवसेना - भाजपचे संयुक्त मेळावे घेण्यात येतील. विरोधकांची प्रचार करताना ससेहोलपट होईल इतपत आमची तयारी झाली आहे. काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडी जागावाटप करतानाच लटपटत आहे. याउलट आमच्या युतीचे जागा वाटप झाले असून विरोधकाना आपला पराभव डोळ्यासमोर दिसत असल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. असेही ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, मुंबई येथील पूल कोसळण्याची घटना दुर्दैवी आहे. या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून दोषींवर कारवाई करण्यात येईल.

हा विषय आम्ही गांभीयार्ने घेतला असून मुंबईतील सर्वच पुलांचा आराखडा तयार करण्यास सांगितले आहे. तसेच प्रत्येक पुलाची जबाबदारी एका व्यक्तीवर देण्यात यावी. त्यामुळे त्याची निगा राखणे सोपे होईल.असे मला वाटते असेही मंत्री देसाई यावेळी म्हणाले.


रणनीती नाही , ही तर प्रेमनीती !

शिवसेनेची आजची ही बैठक रणनीती ठरविण्यासाठी नाही तर खासदार विनायक राऊत यांचे अभिष्ठचिंतन करण्यासाठी आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे ही रणनीती नसून प्रेमनीती आहे. असे मिश्कीलपणे मंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी सांगितले.

प्रचार यंत्रणेचा घेतला आढावा !

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या शुक्रवारी झालेल्या कणकवली येथील बैठकीत प्रचार यंत्रणेचा आढावा घेतला. तसेच शिवसैनिकाना काही मार्गदर्शक सूचनाही केल्याचे समजते. बैठकीच्या ठिकाणी प्रसिद्धी माध्यमांना प्रवेश नव्हता !

 

Web Title: Kuruburi in the alliance will soon be removed: Subhash Desai's sonata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.