विजापुरातील निवडणुकीसाठी मजूर रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 06:38 PM2021-01-01T18:38:07+5:302021-01-01T18:39:59+5:30
Karnatak Election sindhudurg -कर्नाटक राज्यातील विजापूर परिसरात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे जोरात आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात मजुरीनिमित्त आलेल्या मजूरवर्गाचे तांडेच्या तांडे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विजापूर परिसरात रवाना होत आहेत. त्यामुळे एसटीच्या विजापूरला जाणाऱ्या गाड्या हाऊसफुल होत आहेत.
कणकवली : कर्नाटक राज्यातील विजापूर परिसरात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे जोरात आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात मजुरीनिमित्त आलेल्या मजूरवर्गाचे तांडेच्या तांडे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विजापूर परिसरात रवाना होत आहेत. त्यामुळे एसटीच्या विजापूरला जाणाऱ्या गाड्या हाऊसफुल होत आहेत.
या बसमध्ये उभे रहायला जागा नसली तर ही मंडळी नंतर येणाऱ्या कोल्हापूरपर्यंतच्या गाड्यांमधून मार्गस्थ होत आहेत. कुडाळ-विजापूर गाडीमध्ये प्रवाशांची गर्दी दिसून येत आहे. यातील मजूर आम्ही मतदानासाठी गावी जात असल्याचे सांगत आहेत. मात्र, निवडणूक कोणती आहे याची त्यांना माहिती नाही. यासंदर्भात एसटीच्या वाहतूक नियंत्रकांकडे विचारणा केली. त्यावेळी त्यांनीही गेले चार दिवस थेट विजापूरला जाणाऱ्या गाड्या मजुरांनी भरून जात आहेत. तसेच या फेऱ्या मर्यादित असल्याने अनेकजण प्रथम कोल्हापूरला जाऊन तिथून विजापूरला रवाना होत आहेत.
विशेष म्हणजे मतदानासाठी जाणाऱ्यांना आपल्या गावा-गावांत कोणत्या निवडणुका आहेत, याची गंधवार्ता नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दर दिवशी ५०० ते १००० रुपये कमवणारे हे मजूर कोणत्या आमिषापोटी चार-सहा दिवसांची मजुरी बुडवून गावी जात आहेत, हे न उलगडणारे कोडे आहे. या मजुरांपैकी अनेक जणांची निवडणूक ओळखपत्रे आणि रास्त दराच्या धान्य दुकानात दारिद्र्य रेषेखालील रेशनकार्डे कर्नाटकासह महाराष्ट्रातही आहेत. ही मंडळी गावाकडील ज्वारी, बाजरी, तांदूळ आदी धान्य खातात. रेशनवर मिळणारी धान्ये काळ्या बाजारात विकतात.
या विजापूरच्या मंडळींपैकी बहुतांश जणांची कर्नाटकसह महाराष्ट्रातही रेशनकार्डासह निवडणूक ओळखपत्रे आहेत. त्यांची शासकीय यंत्रणेने चौकशी करावी, अशी मागणी कोकण विकास आघाडीचे मुख्य संघटक गणपत तथा भाई चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.