लोकसहभागातून प्रयोगशाळा
By admin | Published: March 2, 2016 11:50 PM2016-03-02T23:50:13+5:302016-03-02T23:50:45+5:30
नांदरूख प्राथमिक शाळेचा उपक्रम : विद्यार्थ्यांमध्ये संशोधकवृत्ती निर्माण करण्याचा प्रयत्न
चौके : एखाद्या गावातील ग्रामस्थांना आणि विद्यार्थ्यांच्या पालकांना शिक्षणाविषयी आवड असल्यास लोकसहभागातून पाहिजे ती गोष्ट साध्य करता येते हे नांदरुख गावातील ग्रामस्थांनी प्राथमिक शाळेला सुसज्ज प्रयोगशाळा देऊन दाखवून दिले आहे.
या प्रयोगशाळेमुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची वृत्ती जागृत होईल. नांदरुख गावातील दानशूर ग्रामस्थांनी आधुनिक तंत्रज्ञान आणि विज्ञानाची गरज ओळखून विद्यार्थ्यांना प्रयोगशाळा साहित्य उपलब्ध करून दिले. त्यामुळे त्यांचे शिक्षणाविषयीचे प्रेम आणि निष्ठा कौतुकास्पद आहे. तसेच शाळेच्या शिक्षकांनी ग्रामस्थांमध्ये विश्वास निर्माण केल्याचेही कौतुक आहे.
नांदरुख गावचे विद्यार्थी प्रयोगशाळेचा उपयोग करून घेऊन स्वत:चा, शाळेचा, गावाचा लौकीक निश्चितपणे वाढवतील. विज्ञान प्रयोगशाळेच्या देखभालीसाठी विशेष निधी आणि प्रशालेत शास्त्र शिक्षकांच्या नियुक्तीसाठी मी प्रयत्न करेन, असे प्रतिपादन मालवण तालुका गटशिक्षणाधिकारी दत्तात्रय मुळीक यांनी पूर्ण प्राथमिक शाळा नांदरुख आंबडोस येथे लोकवर्गणीतून उभारलेल्या विज्ञान प्रयोगशाळेच्या लोकार्पण सोहळ्यावेळी बोलताना केले.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून चौके हायस्कूलचे मुख्याध्यापक ना. धा. सावंत, उद्घाटक विजय चव्हाण, श्रीधर भगत, गणेश भगत, पंचायत समिती शिक्षण विस्तार अधिकारी वसंत महाले, भाऊ चव्हाण, लक्ष्मण चव्हाण, सुनिल चव्हाण, सुरेश चव्हाण, भाई चव्हाण, सुरेश चव्हाण, दत्तप्रसाद परुळेकर, माजी मुख्याध्यापक सदाशिव गावडे, नांदरुख सरपंच समृद्धी चव्हाण, माजी सरपंच स्मिता पाटकर, दत्तप्रसाद परुळेकर, मुख्याध्यापक विलास सरनाईक, चारुशिला चव्हाण, सुरेश साळकर, समीर चव्हाण, पूर्णानंद सरंबळकर, रमेश चव्हाण, दिनेश चव्हाण, डॉ. शरदचंद्र काळसेकर आदी उपस्थित होते.
यावेळी सर्वप्रथम सरपंच समृद्धी चव्हाण यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर उद्घाटक विजय चव्हाण यांच्या हस्ते फित कापून प्रयोगशाळेचे प्रशालेसाठी लोकार्पण करण्यात आले. यावेळी प्रशालेच्यावतीने उपस्थित मान्यवर आणि माजी शिक्षकांचा शाल आणि गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांनी बनविलेल्या हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले. तसेच सातवीतील विद्यार्थ्यांना चषक देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश चव्हाण यांनी केले तर आभार संगम चव्हाण यांनी मानले. (वार्ताहर)
जिल्ह्यातील पहिली शाळा : मुलांच्या चेहऱ्यावर आनंद
सुसज्ज प्रयोगशाळा असणारी नांदरुख प्राथमिक शाळा ही मालवण तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील पहिली प्राथमिक शाळा असावी असा अंदाज काही वक्त्यांनी बोलताना व्यक्त केला. हायस्कूलमध्ये गेल्यानंतर जी प्रयोगशाळा बघावयास मिळणार होती ती विज्ञान प्रयोगशाळा आतापासूनच आपल्याला हाताळायला मिळणार याचा आनंद मुलांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.
विज्ञानाची गोडी लावण्याचा प्रयत्न : सरनाईक
विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागली पाहिजे, प्रत्यक्ष प्रयोगातून विज्ञानाची अनुभूती विद्यार्थ्यांना व्हावी म्हणूनच आपण दानशूर ग्रामस्थांच्या मदतीने ही प्रयोगशाळा सुरु करण्याचा प्रयत्न केला आहे. भविष्यात विद्यार्थ्यांना विज्ञानाबाबत आवड निर्माण होईल. त्यामुळे हा उपक्रम भविष्यात जिल्ह्यात अन्य ठिकाणीही राबविला जाईल, असे यावेळी प्रास्ताविक करताना मुख्याध्यापक विलास सरनाईक यांनी सांगितले.