कणकवली तालुक्यात पावसामुळे लाखोंचे नुकसान
By admin | Published: September 26, 2016 09:30 PM2016-09-26T21:30:09+5:302016-09-26T23:19:29+5:30
फोंडा परिसराला मोठा फटका : पावसाने उसंत घेतल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कणकवली : कणकवली शहरासह सिंधुदुर्गात शनिवारी मुसळधार पाऊस पडला होता. मात्र, रविवारी पावसाने काहीसी उसंत घेतली. त्यामुळे चिंताग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. शनिवारी झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने अनेक घरात तसेच दुकानात पाणी घुसल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र नेमकी आकडेवारी सोमवारीच समजू शकणार आहे.
कणकवली तालुक्यातील शिवगंगा नदीला पूर आल्याने फोंडा, लोरे नं.१, वाघेरी, कासार्डे आदी गावातील ११० घरे तसेच दुकाने पुराच्या पाण्याने बाधित झाली आहेत. तर सुमारे १०० ग्रामस्थांना शनिवारी रात्री खबरदारीचा उपाय म्हणून स्थलांतरित करण्यात आले होते.
गेले दोन दिवस सिंधुदुर्गात जोरदार पाऊस झाला. शनिवारी दिवसभर क्षणाचीही विश्रांती न घेता जोरदार पाऊस पडत होता. त्यामुळे नद्या, ओहोळ, नाले दुथडी भरून वाहत होते. अनेक ठिकाणी घरात पाणीही शिरले होते. त्यामुळे अन्नधान्याचे नुकसान झाले आहे.
भातशेतीलाही मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. मात्र तालुक्यातील पुराच्या पाण्याने बाधित झालेल्या सर्वच गावातील नुकसानीचा नेमका आकडा समजू शकलेला नाही. रविवारी शासकीय कार्यालयाना सुट्टी असल्याने शेती तसेच इतर नुकसानी बाबत निश्चित अशी माहिती सोमवारीच समजू शकणार आहे.पावसामुळे भरणी येथील मनोहर तांबे यांच्या घराच्या छपराचे ३००० रुपयांचे नुकसान झाले आहे. तर भिरवंडे येथील रोहिणी धरणे यांच्या घराची भिंत कोसळून १३००० रुपयांचे नुकसान झाले आहे.
पुराच्या पाण्याने फोंडा येथील ५५ घरे तसेच दुकाने, लोरे नं.१ येथील ३५ घरे यामध्ये नरामवाडीतील २७ तर गुरववाडीतील ८ घरांचा समावेश आहे. वाघेरी कुळयेवाडी येथील २ घरे, कासार्डे येथील १८ घरे बाधित झाली आहेत. तर लोरे नं.१ मधील मुकुंद गुरव, शशिकांत गुरव, चंद्रकांत गुरव यांना सुमन गुरव यांच्या घरी स्थलांतरित करण्यात आले होते. वाघेरीतील ८ तर कासार्डेेतील ४५ ग्रामस्थानाही स्थलांतरित करण्यात आले होते. पंचायत समिती सदस्य संजय देसाई यांनी आपल्या घरात काही ग्रामस्थाना ठेवले होते. वाघेरी येथे २ लाखांचे, फोंडा येथील मधुसूदन बांदिवडेकर यांचे खताचे १ लाख ७७ हजार, घोणसरी येथील पांडुरंग शिंदे यांचे ६ हजार रुपयांचे खताचे नुकसान झाले आहे. मंडळ अधिकारी दिलीप पाटील, लोरे तलाठी एस. एन. जंगले, हरकुळ तलाठी एस. व्ही. परुळेकर, करुळ तलाठी आर. व्ही. मसुरकर, शिरवल तलाठी एस. आर. बावलेकर या महसुलच्या पथकाने पाहणी करून पंचयादी घातली. या नुकसानीमध्ये आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
वैभववाडीत सर्वाधिक पावसाची नोंद
सिंधुदुर्ग जिल्ह्यात तालुकानिहाय रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंतचा पाऊस पुढील प्रमाणे आहे. दोडामार्ग - ३६.०० मिमी (३३२२ मिमी), सावंतवाडी - ६५.०० मिमी (३८५३ मिमी), वेंगुर्ला - ३३.८० मिमी (३०९०.४४ मिमी), कुडाळ - ६६.०० मिमी (३३४४ मिमी), मालवण - ४७.०० मिमी (३३९६ मिमी), कणकवली - ७६.०० मिमी (३८४५ मिमी), देवगड - ६०.०० मिमी (३०२७.७० मिमी ) तर वैभववाडीत १६७.०० मिमी (३९०० मिमी) पाऊस झाला आहे. रविवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासात सर्वाधिक पाऊस वैभववाडीत झाला आहे.
फोंडयात मोरी खचली !
पावसामुळे फोंडा कुर्ली रस्त्यावरील बावीचे भाटले येथील मोरी खचली आहे.
रेल्वे उशिराने
मुसळधार पावसाचा रेल्वे सेवेवरही परिणाम झाला आहे. कोकण रेल्वे मार्गावरुन गोव्याच्या दिशेने जाणारी कोकण कन्या एक्स्प्रेस रविवारी ६ तास ४५ मिनिटे उशिराने धावत होती. तर मडगाव वरुन मुंबईकडे जाणारी कोकण कन्या एक्स्प्रेस २ तास उशिराने सुटली होती. या गाड्यांबरोबरच अन्य काही गाड्यांही काहीशा विलंबाने धावत होत्या.