मीठ उत्पादक आर्थिक अडचणीत कामगारांची कमतरता
By admin | Published: May 31, 2014 12:53 AM2014-05-31T00:53:31+5:302014-05-31T01:13:20+5:30
शिरोडा मिठागरात १0२ मेट्रीक टन मिठाचे नुकसान
अभिजीत पणदूरकर / शिरोडा इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरोधात सन १९३० साली झालेल्या ऐतिहासिक मीठ सत्याग्रहामुळे राष्टÑीय दर्जाचे महत्त्व प्राप्त झालेल्या मिठागरांवरील मीठ उत्पादन घेणारे मीठ उत्पादक निसर्गाचा अनियमितपणा व मिठागरांमध्ये काम करणार्या कामगारांची कमतरता या समस्यांमुळे आर्थिक अडचणीत सापडले आहेत. तसेच अवकाळी पडलेल्या पावसामुळे शिरोडा येथील १0२ मेट्रीक टन मिठाचे नुकसान झाले आहे. पावसाळ्यानंतर नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मीठ उत्पादन घेण्याचा हंगाम प्राथमिक स्वरुपात सुरू होतो. त्यानंतर मीठ तयार करण्यासाठी समुद्राचे खारे पाणी साठविण्यासाठी विशिष्ट प्रकारचे चौकोनी वाफे तयार करण्यात येतात. त्या चौकोनी वाफ्यात समुद्राचे खारट पाणी साठविले जाते. या प्राथमिक तयारीसाठी सुमारे एक महिन्याचा कालावधी जातो. त्यानंतर एक महिन्यानंतर फेब्रुवारीपासून प्रत्यक्ष मीठ उत्पादन घेण्यास सुरुवात होते. हा हंगाम पाऊस सुरू होईपर्यंत जून महिन्यापर्यंत चालतो. मीठ तयार होण्यासाठी मिठागरातील खारट पाण्याला १६ डिग्री उष्णता मिळणे आवश्यक असून मार्च, एप्रिल, मे या महिन्यात मात्र, अधिक उष्णता मिळाल्याने मिठागरातील पाण्याचे बाष्पीभवन लवकर होते. त्यामुळे मीठ लवकर तयार होऊन उत्पादनाचा वेग वाढतो. या तीन महिन्यात मोठ्या प्रमाणांवर मीठ उत्पादन होत असते. मात्र, यावर्षी फेब्रुवारी, मार्च, एप्रिल महिन्यातील मीठ उत्पादन घेतल्यानंतर मे महिन्याच्या सुरुवातीला मुसळधार पाऊस पडल्यानंतर मुख्य हंगामातील पूर्ण मे महिन्यात मीठ उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. परंतु मेच्या अखेरीस पाऊस न लागल्यास जूनच्या सुरुवातीपर्यंत मीठ उत्पादन करणे शक्य होणार आहे. १0२ मेट्रीक टन मिठाचे नुकसान मे महिन्यात पाऊस पडल्याने शिरोडा येथील मिठागरातील १०२ मेट्रिक टन मीठ उत्पादनाचे नुकसान झाले आहे. याबाबत अहवाल पाठविल्याची माहिती शिरोडा येथील मीठ इन्स्पेक्टर बी. एस. शिंदे यांनी दिली.