खो-खो स्पर्धांमध्ये लाड भगिनींची हुकुमत

By Admin | Published: January 6, 2016 11:53 PM2016-01-06T23:53:16+5:302016-01-07T00:57:22+5:30

--यश रत्नकन्यांचे

Ladies' rule in Kho-Kho competitions | खो-खो स्पर्धांमध्ये लाड भगिनींची हुकुमत

खो-खो स्पर्धांमध्ये लाड भगिनींची हुकुमत

googlenewsNext



जिल्ह्याच्या लौकिकात भर टाकणाऱ्या रत्नकन्यांच्या यशाची मालिका
मेहरून नाकाडे ल्ल रत्नागिरी
इयत्ता आठवीत शिकत असल्यापासून खो-खो खेळाची आवड निर्माण झाली. रा. भा. शिर्के प्रशालेत शिकत असताना क्रीडा शिक्षक विनोद मयेकर यांनी शालेय खो-खोच्या संघात निवड केली आणि खेळाचा सराव सुरू झाला. शालेयस्तरावरील विविध स्पर्धेत सहभागी होत असताना मिळणाऱ्या यशामुळे उत्साह वाढत गेला. आई-बाबांनीही प्रोत्साहन दिले. दहावीनंतर अकरावी विज्ञान शाखेसाठी गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात प्रवेश घेतला. सध्या व्दितीय वर्ष कला शाखेत शिकत असून, माझ्याप्रमाणेच माझी धाकटी बहीण श्रध्दा लाड हीदेखील विविध स्पर्धांमध्ये यश मिळवत आहे. खो-खो या खेळात लाड भगिनींनी राष्ट्रीय स्पर्धांमध्ये यश मिळवले, असे धनश्री लाड हिने सांगितले.
शासकीय विश्रामगृहातील क्वार्टर्समध्ये राहणाऱ्या धनश्री लाड हिने खेळासाठी बारावीनंतर कला शाखेत प्रवेश घेतला. विज्ञान शाखेत शिकत असताना खेळामुळे प्रॅक्टिकल, लेक्चर्स चुकत असत. त्या कालावधीतील अभ्यास भरून काढण्यासाठी खूप फरपट व्हायची. त्यामुळे धनश्री हिने कला शाखेची निवड केली.
श्रध्दा अकरावी कला शाखेत शिकत आहे. दररोज सकाळी व संध्याकाळी न चुकता मैदानावर दोन्ही भगिनी सरावासाठी उपस्थित असतात. दोन्ही भगिनींच्या खेळातील यशामुळेच त्यांचा धाकटा भाऊ अनिरूध्द यालाही खो-खोची आवड निर्माण झाली आहे. सर्व भावंडात खो-खोबद्दल आवड निर्माण झाली असून त्यांनी विविध स्पर्धांमध्ये यश मिळवले आहे. लाड भगिनींच्या या यशाचे कौतुक साऱ्यांनाच आहे.
अनिरूध्द इयत्ता पाचवीत शिकत असून, तोही मुलांच्या गटात खो-खो स्पर्धेत सहभागी होत आहे. धनश्री व वर्षा या दोन्ही सध्या महाराष्ट्राच्या संघात खेळत आहेत. रत्नागिरी जिल्हा खो-खो असोसियशनचे सचिव संदीप तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पंकज चवंडे लाड भावंडाना प्रशिक्षण देत आहेत.
धनश्री हिने खो-खोबरोबरच क्रॉसकंट्री स्पर्धेतही यश मिळविले आहे. खो-खो राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्पर्धेत प्रत्येकी कांस्यपदक, ४.१00 रिले विद्यापीठीय स्पर्धेत व खो-खो राज्यस्तरीय अश्वमेध स्पर्धेत सुवर्णपदक, खो-खो राज्यस्तरीय व सिनियर राज्यस्तरीय स्पर्धेत रौप्यपदक, आॅल इंडिया राष्ट्रीय स्पर्धेत कांस्य, तर राज्यस्तरीय ग्रामीण स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले आहे. आॅल इंडिया राष्ट्रीय क्रॉसकंट्री स्पर्धेतही तिने सहभाग घेतला.
बहिणीबरोबर श्रध्दा हिनेदेखील खेळातील आपली चमक दाखवली आहे. नुकतीच ओडिसा, भुवनेश्वर येथे झालेल्या १८ वर्षांखालील राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक, तर फलटण येथे झालेल्या सिनियर राज्यस्तरीय स्पर्धेत रौप्य पदक, सांगली येथे झालेल्या १९ वर्षीय शालेय स्पर्धेत रौप्यपदक, ग्रामीण राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले आहे. मध्यप्रदेश येथे झालेल्या १९ वर्षे वयोगटातील शालेय स्पर्धेतही सहभागी झाली होती.
शिक्षणाबरोबर खेळही सुरूच ठेवणार असून, खेळाकडे दुर्लक्ष होऊ नये, यासाठी विविध स्पर्धांमध्ये सहभाग शिवाय त्यासाठी लाड भगिनींचा भरपूर सराव सुरू आहे. खो-खो मध्ये राष्ट्रीय पातळीवर चमकून शासकीय सेवेत नोकरी मिळविण्याचे दोघी बहिणींचे ध्येय आहे.


विविध स्पर्धांमधील धनश्रीचे यश
राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत कांस्य.
राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत कांस्य.
विद्यापीठीय खो-खो स्पर्धेत सुवर्णपदक.
राज्यस्तरीय अश्वमेध महोत्सवात सुवर्णपदक.
राज्यस्तरीय स्पर्धेत रौप्यपदक.
वरिष्ठ राज्यस्तरीय स्पर्धेत रौप्यपदक.
अखिल भारतीय राष्ट्रीय स्पर्धेत कांस्य.
राज्यस्तरीय ग्रामीण स्पर्धेत सुवर्णपदक.
आॅल इंडिया राष्ट्रीय क्रॉसकंट्री स्पर्धेत सहभाग.
श्रध्दा हिचे विविध स्पर्धेतील यश
१८ वर्षांखालील राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक.
सिनियर राज्यस्तरीय स्पर्धेत रौप्य पदक.
१९ वर्षीय शालेय स्पर्धेत रौप्यपदक, - ग्रामीण राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक
मध्यप्रदेश येथे झालेल्या १९ वर्षे वयोगटातील शालेय स्पर्धेत सहभाग.

Web Title: Ladies' rule in Kho-Kho competitions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.