लखडतरवाडीतील तर वाहतूक होणार बंद

By admin | Published: January 22, 2015 11:32 PM2015-01-22T23:32:41+5:302015-01-23T00:46:26+5:30

निधी मिळणार : विजनवासातील वाडीला मिळणार हक्काचा पूल

In Lakhardarwadi, traffic will stop | लखडतरवाडीतील तर वाहतूक होणार बंद

लखडतरवाडीतील तर वाहतूक होणार बंद

Next

आंजर्ले : स्वातंत्र्यानंतरही पंचनदी लखडतरवाडी विजनवासात होती. आता येथील खाडीवर पूल बांधण्यासाठी ४ क ोटी ९७ लाख ७२ हजार रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे लखडतरवाडी येथील तरवाहतूक आता बंद होणार आहे.
पंचनदीतील लखडतरवाडीची उपेक्षा स्वातंत्र्यानंतरही सुरूच होती. खाडीमुळे लखडतरवाडी मुख्य गावापासून वेगळी पडली होती. लखडतरवाडीत सत्तर ते ऐंशी घरे आहेत. खारवी, भंडारी, मुस्लीम, समाजाची लोकं या लखडतर वाडीत राहतात.
या खाडीवर पूल नसल्याने, वर्षातील तिन्ही ऋतुंमध्ये या खाडीतूनच जावे लागत होते. त्यामुळे ग्रामस्थांचे हाल होत होते. पावसाळ्यात तर, खाडी पार करून जाताना ग्रामस्थांची मोठी पंचाईत होत होती. पंचनदीतून या वाडीत जाण्यासाठी होडीतून खाडी पार करावी लागते. स्वातंत्र्यानंतर वारंवार इथल्या ग्रामस्थांनी या खाडीवर पूल बांधण्याची मागणी केली होती. मात्र या मागणीला वर्षानुवर्षे वाटाण्याच्या अक्षता दाखवण्यात आल्या. लखडतरवाडीतील ग्रामस्थांचा वनवास स्वातंत्र्यानंतरही संपला नव्हता.
दळणवळणासाठी होडी हे एकमेव साधन होते. पावसाळ्यात या वाडीचा गावाशी संपर्क तुटत असे. मात्र, त्याही परिस्थितीत ग्रामस्थ या वाडीत राहत असत. एखाद्या गरजेसाठी पलीकडे जायचे झाल्यास, तर खुली होण्याची वाट पहावे लागत होते.
गावातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी होडीतून प्रवास करावा लागत असे. पावसाळ्यात जीव धोक्यात घालून हा प्रवास चालत असे. या खाडीत होडीतून प्रवास करताना अनेक अपघात झाले. अपघात झाल्यानंतर पुलाची मागणी जोर धरत असे. ग्रामस्थांना पूल बांधण्याची आश्वासने पुन्हा दिली जात असत. मात्र याची पूर्तता होत नव्हती. स्वातंत्र्यानंतर लखडतरवाडीची फरफट सुरूच होती. वाडीतून गावात जाण्यासाठी प्रत्येकाला चार रूपये मोजावे लागत होते. त्यामुळे या खाडीवर पूल व्हावा, यासाठी ग्रामस्थांचे गेले अनेक दिवस प्रयत्न सुरू होते.
साधा किराणा माल व रेशन आणण्यासाठी होडी प्रवास हा ठरलेलाच होता. एखाद्या रूग्णाला उपचारासाठी होडीतूनच न्यावे लागत होते. पावसाळ्यात तर कधी कधी होडीची सेवाही बंद ठेवली जात होती. त्यावेळी लखडतर वाडीचा जगाशीच संपर्क तुटत असे. मात्र, आता निर्बुरडेवाडी ते लखडतरवाडी असा पूल बांधला जाणार आहे. या नियोजित पुलाची निविदा प्रसिध्द झाली आहे. या पुलाचे काम सागर कन्स्ट्रक्शन्स, कराड यांना देण्यात आले आहे.
फेब्रुवारी महिन्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरवात होणार आहे. हा पूल उभा राहिल्यानंतर लखडतरवाडीचा विजनवास संपणार आहे. हा पूल लखडतरवाडीच्या विकासाचा सेतू ठरणार आहे, अशी ग्रामस्थांची भावना आहे. (वार्ताहर)


हाल थांबणार
स्वातंत्र्य मिळून एवढी वर्षे उलटली, तरीही लखडतरवाडीतील ग्रामस्थांचे हाल थांबत नव्हते. मात्र आता तर वाहतूक बंद होऊन, या ठिकाणी पूल होणार आहे. आता ग्रामस्थांचे हाल थांबणार असून, हा पूल बांधून पूर्ण होण्याची ग्रामस्थ वाट पाहात आहेत.

Web Title: In Lakhardarwadi, traffic will stop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.