लाखो भाविकांचे तीर्थस्नान

By admin | Published: February 26, 2017 11:54 PM2017-02-26T23:54:29+5:302017-02-26T23:54:29+5:30

कुणकेश्वर यात्रेची सांगता; तीन दिवसांत कोट्यवधीची उलाढाल

Lakhow devotees' pilgrimage | लाखो भाविकांचे तीर्थस्नान

लाखो भाविकांचे तीर्थस्नान

Next

कुणकेश्वर : दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर यात्रेची सांगता देवस्वाऱ्यांच्या व भाविकांच्या पवित्र तीर्थस्नानाने झाली. रविवारी रात्री ८ वाजेपर्यंत अमावास्या असल्यामुळे समुद्रकिनारी धार्मिक विधी व तीर्थस्नान करण्यासाठी लाखो भाविकांनी उपस्थिती लावली. यात्रेमध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली.
शनिवारी-रविवारी सुटीचा दिवस, तसेच रात्री ९.२१ पासून रात्री ८.२८ वाजेपर्यंत अमावास्या असल्यामुळे यात्रेच्या दुसऱ्या व तिसऱ्या दिवशीही भाविकांच्या गर्दीचा ओघ वाढला होता. कुणकेश्वराच्या भेटीसाठी जिल्ह्यातून श्री जयंती देवी रवळनाथ देवस्वारी पळसंब मालवण, श्री भगवती देवी मुणगे, हुंबरट येथील पावणाई देवी या तीन देवस्वाऱ्या आल्या होत्या. या देवस्वाऱ्यांनी रविवारी पहाटेपासून समुद्रात तीर्थस्नानाला जाण्यास सुरुवात केली. देवस्वाऱ्यांबरोबरच तीर्थस्नान करण्यासाठी लाखो भाविकांनी उपस्थिती दर्शविली होती. तीर्थस्नान करून परत श्री कुणकेश्वरचे दर्शन घेण्यासाठी रांगा लागल्या होत्या.
पहाटे तीन वाजल्यापासून समुद्रकिनाऱ्यावर धार्मिक विधींना प्रारंभ झाला. देवस्वाऱ्या व भाविकांच्या तीर्थस्नानावेळी समुद्रकिनारी सुरक्षा ठेवण्यात आली होती. आपत्ती व्यवस्थापन विभाग, पोलिस, स्वयंसेवक समुद्रकिनारी सज्ज होते. पोलिसांची स्पीड बोटही सुरक्षेसाठी काही अंतरावर उभी होती. तीर्थस्नान करताना कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी मंदिर व्यवस्थापन व प्रशासनामार्फतही दक्षता घेण्यात आली होती.
देवस्वाऱ्यांनी तीर्थस्नान करून व देवदर्शन घेऊन परतीचा प्रवास केला. रविवारी सायंकाळपर्यंत भाविकांनी कुणकेश्वराचे दर्शन घेतले. कुणकेश्वर येथे यात्रा कालावधीत प्रसिद्ध भजनी बुवांची भजने झाली. तीन दिवस सुरू असलेल्या यात्रेमध्ये लाखो भाविकांनी दर्शन घेतले, तर कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली.
रस्त्याच्या दुतर्फा विविध प्रकारची मिठाईची दुकाने, हॉटेल्स, मालवणी खाजा, कापड दुकाने, गृहपयोगी वस्तू, चायना खेळणी यामुळे तीन दिवस यात्रा परिसर फुलून गेला होता. उन्हाचा तडाका असल्याने जागोजागी कलिंगडाचे स्टॉलवर भाविकांची एकच गर्दी होती. यात्रेच्या तिसऱ्या दिवशीही कुणकेश्वर येथे थाटण्यात आलेल्या व्यापाऱ्यांच्या दुकानांमध्ये तिसऱ्या दिवशीही मोठ्या प्रमाणावर उलाढाल झाली.
यावर्षी भाविकांना दर्शनाची व्यवस्था चांगल्याप्रकारे केल्याबद्दल भाविकांनी देवस्थान ट्रस्टचे आभार मानले. देवस्थान ट्रस्ट, कुणकेश्वर ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी यात्रेचे चांगल्या पद्धतीने नियोजन केल्याबद्दल भाविकांनी समाधान व्यक्त केले.
यात्रा कालावधीत मोठ्या प्रमाणात सहकार्य करणाऱ्या शासकीय व सामाजिक संस्था यांचे देवस्थान ट्रस्ट कुणकेश्वर, कुणकेश्वर सेवा मंडळ मुंबई, ग्रामपंचायत कुणकेश्वर यांच्यावतीने आभार मानण्यात आले.

Web Title: Lakhow devotees' pilgrimage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.