लाखो भाविकांनी फेडले नवस
By Admin | Published: February 26, 2016 12:22 AM2016-02-26T00:22:02+5:302016-02-26T00:22:02+5:30
भराडी देवी यात्रा : प्रशासनाला हाताशी धरत ग्रामविकास मंडळाचे नियोजन
मालवण : मालवण तालुक्यातील मसुरे येथील आंगणेवाडीच्या भराडी यात्रोत्सवात देशभरातून आलेल्या लाखो भाविकांनी दर्शन घेवून नवस फेडले. पहाटेपासून भाविकांनी रांगा लावल्या होत्या.
यात्रोत्सवात पोलीस, महसूल, जिल्हा आरोग्य विभाग, विधीसेवा समिती, आपत्ती व्यवस्थापन असे शासकीय कक्ष होते. भाजपातर्फे मोफत नेत्रचिकित्सा व चष्मावाटप शिबिर पार पडले. पोलिसांनी पाच ठिकाणी वॉच टॉवर उभारले होते. मालाड येथील ओम साई पदयात्रा मंडळाने मालाड ते आंगणेवाडी पदयात्रा करत देवीचे दर्शन घेतले. विविध बचतगटांचे स्टॉल उभारण्यात आले होते. सिंधुदुर्ग बँक, नाबार्ड, महिला स्वयंसहायता बचतगट उत्पादीत मालाचे प्रदर्शन व विक्री करण्यात येत होती. मालवणी मसाला, कोकणी मेव्याची दुकाने थाटण्यात आली आहेत. जयभवानी सेवा मंडळ मुंबईच्या अरूण दुधवडकर यांच्यातर्फे यात्रेत मोफत सरबत वाटप करण्यात येत होते. वीज वितरण, पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी यात्रोत्सवात सेवा बजावली.
रात्री दहा वाजेपर्यंत दर्शनरांगा सुरू होत्या. त्यानंतर प्रसाद वाटपासाठी काही काळ त्या थांबविण्यात आल्या. यात्रोत्सवात काँग्रेस आणि भाजपाने स्वतंत्ररित्या कार्यालये थाटून येणाऱ्या भाविकांचे स्वागत केले. तसेच भाजपातर्फे सदस्य नोंदणी करण्यात आली.
आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळाचे भास्कर आंगणे, आनंद आंगणे, मंगेश आंगणे, सतीश आंगणे व नरेश आंगणे कुटुंबियांनी भाविकांचे स्वागत
केले. (प्रतिनिधी)
दुष्काळाच्या संकटातून मुक्त कर : नारायण राणे
राज्यात दुष्काळाचे आस्मानी संकट आहे तर दीड वर्षापूर्वी सत्तेत आलेले युती शासनाचे 'सुलतानी' संकट आहे. या दुहेरी संकटात राज्यातील जनता होरपळली आहे. राज्यातील जनता तसेच शेतकऱ्यांवर ओढवलेले दुष्काळाच्या संकटातून मुक्त कर, असे साकडे राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आंगणेवाडी देवी भराडी चरणी घातले. आंगणेवाडी भराडी देवी यात्रोत्सवात नारायण राणे यांनी सपत्नीक भराडी देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आला.
व्हीआयपींची हजेरी
माजी आमदार अजित गोगटे, शिवराम दळवी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, अतुल काळसेकर, राजन म्हापसेकर, मालवणी कलाकार लवराज कांबळी, शिवसेनेचे रवींद्र फाटक, काँग्रेसचे दत्ता सामंत, अशोक सावंत, सुदेश आचरेकर, दीपक पाटकर तसेच जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी, मुंबईतील शिवसेनेचे नगरसेवक नाना पटोले, मुंबई मनपा विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर, मुंबईतील शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, विभागप्रमुखांनी भराडी देवीचे दर्शन घेतले.