मुंबईच्या प्रवासासाठी वेंगुर्ल्यातील लालपरी सज्ज, आधारकार्ड आवश्यक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 02:59 AM2020-06-26T02:59:15+5:302020-06-26T02:59:21+5:30
दोन लालपरी वेंगुर्ला-शिरोडा ते बोरिवली पर्यंतच्या प्रवाशांना सेवा देण्यासाठी सज्ज झाल्या आहेत, अशी माहिती वेंगुर्ला आगारप्रमुख एन. डी. वारंग यांनी दिली.
वेंगुर्ला : वेंगुर्ला आगारातर्फे सिंधुदुर्ग जिल्हा ते मुंबई असा प्रवास करू इच्छिणाऱ्यांना खूषखबर देण्यात आली आहे. यासाठी विठाई एक्स्प्रेस आणि साई मानसीश्वर या दोन लालपरी वेंगुर्ला-शिरोडा ते बोरिवली पर्यंतच्या प्रवाशांना सेवा देण्यासाठी सज्ज झाल्या आहेत, अशी माहिती वेंगुर्ला आगारप्रमुख एन. डी. वारंग यांनी दिली.
यावेळी वारंग पुढे म्हणाले की, शिरोडा, वेंगुर्ला, कुडाळ, कणकवली, राजापूर, लांजा, हातखंबा, संगमेश्वर, चिपळूण, महाड, माणगाव, पेण, पनवेल, खारघर, तुर्भेनाका, कळवा, ठाणे, मुलुंड, भांडूप, चेंबूर, सायन, दादर, परेल, बांद्रा, अंधेरी, मालाड, गोरेगांव, कांदिवली, बोरिवली असा या बसचा प्रवास असणार आहे.
शासनाच्या नियमांनुसार बसमधील प्रवासी संख्या २२ असणार आहे. तसेच बसमधील २२ सीटचा ग्रुप पूर्ण झाल्यानंतरच बस सुटणार आहे. याची प्रवाशांनी नोंद घ्यायची आहे. तसेच प्रवासात आधारकार्ड, मेडिकल सर्टिफिकेट सोबत असणे आवश्यक असणार आहे. या गाडीचा तिकीट दर शिरोडा ते बोरिवली ३४०० रुपये व वेंगुर्ला ते बोरिवली ३३०० रुपये असा ठेवण्यात आला आहे. बुकींगसाठी आगाराशी संपर्क साधावा, असे आवाहनही वारंग यांनी केले आहे.