करवंटीपासून दिवे अन् आकाश कंदील, दीपोत्सवासाठी विकल्पच्या टीमची निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 03:44 PM2020-09-17T15:44:53+5:302020-09-17T15:47:48+5:30
रक्षाबंधन सणाला करवंटीपासूनच्या राख्यांचा नवा ब्रँड निर्माण करणाऱ्या मालवणातील विकल्पच्या टीमने आता दिवाळी सणासाठी पुन्हा एकदा नारळाच्या टाकाऊ (जळाऊ) करवंटीपासून सुबक, आकर्षक, पर्यावरणपूरक वस्तूंचा विकल्प निर्माण केला आहे.
सिद्धेश आचरेकर
मालवण : रक्षाबंधन सणाला करवंटीपासूनच्या राख्यांचा नवा ब्रँड निर्माण करणाऱ्या मालवणातील विकल्पच्या टीमने आता दिवाळी सणासाठी पुन्हा एकदा नारळाच्या टाकाऊ (जळाऊ) करवंटीपासून सुबक, आकर्षक, पर्यावरणपूरक वस्तूंचा विकल्प निर्माण केला आहे. स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे प्राध्यापक तथा पर्यावरण अभ्यासक हसन खान व त्यांच्या टीमने यावर्षीचा दीपोत्सव द्विगुणित करण्यासाठी करवंटीपासून दिवे, कंदील तसेच झुमर, शो-पीस आदी उत्पादन निर्मिती केली आहे.
निसर्गाच्या अस्तित्वावर आपले अस्तित्व अवलंबून आहे. पण प्लास्टिकच्या विळख्यात आपण स्वत:ला अडकवून ठेवले आहे. प्लास्टिकला पर्याय शोधणे ही विकल्पची प्राथमिकता आहे. अशा पर्यावरणपूरक वस्तू आम्ही आपणा समोर आणत आहोत. प्रदूषणाचा स्तर दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यात असे छोटे घटक, कृती मोठा आघात पर्यावरणावर करीत असतात. करवंटीला चुलीमधून बाहेर काढून या इंधनाचे धनरुप समाजासमोर आणण्याचा ह्यविकल्पह्णच्या टीमचा प्रयत्न आहे, अशी माहिती प्रा. खान यांनी दिली.
विकल्प हा पर्यावरणपूरक वस्तू बनविणारा लघुउद्योग आहे. विकल्पच्या टीममध्ये हसन खान यांच्यासह त्यांच्या पत्नी अमरिन खान, अजय आळवे, पायल शिरपुटे व मधुरा ओरसकर यांचा समावेश आहे. हसन खान यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या नव्या व्यवसायाची प्रत्येकाकडे जबाबदारी देण्यात आली आहे.
करवंटी कापण्यापासून तिला आकार देण्याचे काम स्वत: खान व अजय तर रंगरंगोटी व नक्षी कोरण्याचे काम पायल व मधुरा करतात. तर साचा बांधणीचे काम अमरीन या करतात. यातील अजय, पायल व मधुरा हे तिघे खान यांचे महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत. विशेष म्हणजे हे विद्यार्थी घरी दिलेले काम जबाबदारीने पूर्ण करतात.
लोक करवंटीचा इंधन म्हणून वापर करतात. त्यामुळे आपल्याकडील भागात बहुतांश घरांमध्ये प्रदूषण होते. करवंटी विकत घेतल्याने गावागावातील प्रदूषण टळेल या हेतूने मालवणसह पेंडूर, काळसे या गावातून आम्ही प्रति किलो सात रुपये दराने करवंटी खरेदी करतो. प्लास्टिक किंवा तत्सम वस्तूमुळे पर्यावरणावर आघात होतो. त्यामुळे त्या वस्तूंना पर्यावरणपूरक पर्याय देणे हीच आपली भूमिका आहे, असे खान यांनी सांगितले.
विकल्पची दिवाळीसाठी नावीन्यपूर्ण निर्मिती
विकल्पच्या टीमने यावर्षीच्या दिवाळी सणाकरिता लहान, मध्यम, मोठे, फुलवात असे चार प्रकारचे करवंटी दिवे बनविले आहेत. तर करवंटीपासून एलईडी लाईटचे लहान, मोठ्या अशा दोन प्रकारात हँगींग लॅम्पची निर्मिती केली आहे. चौकोनी, वर्तुळाकार, षटकोनी आकारात करवंटीपासून आकाश कंदील बनविण्यात येत आहेत.
या बनविण्यात आलेल्या वस्तूंवर कलाकुसर असेल. शिवाय ग्राहकाच्या मागणीप्रमाणेही नक्षीकाम करून दिले जाणार आहे. मुंबई, पुण्यातून आगाऊ बुकिंगही झाली आहे. करवंटीपासूनच्या वस्तूची आॅर्डर बुक करण्यासाठी हसन खान किंवा ईमेल आयडीवर संपर्क साधण्याचे आवाहन खान यांनी केले आहे.
पर्यावरण संवर्धनासही हातभार
पर्यावरणपूरक संकल्पना वेगवेगळ्या टीम करून मुलांना देत आहोत. ज्यातून छोटे छोटे लघुउद्योग निर्माण होतील आणि मुलांना अर्थार्जनाचा मार्ग मिळेल. यातून नकळत पर्यावरणाच्या संवर्धनामध्ये हातभारदेखील लागेल. प्रत्येक घरात हा लघुउद्योग स्वयंपूर्ण व्हायला हवा अशी धारणा असल्याने प्लास्टिकसारख्या घातक वस्तूंना पर्याय म्हणून आम्ही पर्यावरणपूरक वस्तूंचा विकल्प देत आहोत, असे विकल्प टीमने स्पष्ट केले.