हेल्पलाईनला आधार मोबाईलऐवजी लँडलाईनचा

By admin | Published: November 25, 2015 12:16 AM2015-11-25T00:16:08+5:302015-11-25T00:31:55+5:30

स्टींग आॅपरेशनआज आंतरराष्ट्रीय महिला अत्याचार विरोधी दिन : कक्ष स्थापन, हेल्पलाईनचा प्रसार नाहीच, पोलीस अधिकाऱ्यांंसह नागरिकही दूरच

Landline's supportline instead of mobile phone support line | हेल्पलाईनला आधार मोबाईलऐवजी लँडलाईनचा

हेल्पलाईनला आधार मोबाईलऐवजी लँडलाईनचा

Next

अनंत जाधव -- सावंतवाडी --सर्वत्र महिलांवर होणारे वाढते अत्याचार लक्षात घेऊन शासनाने सुरू केलेल्या १०३ या हेल्पलाईनचा सिंधुदुर्गमध्ये हवा तसा प्रचार झाला नसून, या महिलांच्या बाबतीत कोणतीही घटना घडल्यानंतर हेल्पलाईनशी संपर्क करायचा तर लँडलाईन फोनचा आधार घ्यावा लागत आहे. हा नंबर भ्रमणध्वनीवरून लागत नसल्याचे पुढे आले आहे. तर दुसरीकडे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्येही या हेल्पलाईनचा प्रसार झाला नसून, नागरिकही या हेल्पलाईनपासून दूरच आहेत.राज्यासह देशात महिलांवर मोठ्या प्रमाणात अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे केंद्र व राज्य सरकार यांनी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी महिलांसाठी खास हेल्पलाईन सुरू केली आहे. ही हेल्पलाईन जिल्ह्याच्या पोलीस मुख्यालयात असून, त्यासाठी एक महिला अधिकाऱ्यासह पोलीस कर्मचाऱ्यांचा स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. हा कक्ष सिंधुदुर्गमध्ये ओरोस येथे आहे. या ठिकाणी कक्षप्रमुख म्हणून महिला पोलीस निरीक्षक पाटील यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्या दिमतीला पाच पोलीस कर्मचारी आहेत.मात्र, एखाद्याने महिला अत्याचाराबाबत फोन केला, तर त्यांचा संपर्क थेट हेडक्वॉर्टरला होतो. पण त्यांचा संपर्क १०३ या हेल्पलाईनशी होत नाही. जर एखाद्याला गरजच असेल, तर लँडलाईन फोन शोधून त्यावरून या हेल्पलाईनशी संपर्क करावा लागत आहे.या हेल्पलाईनबाबत अधिकारी वर्गातच जागरूकता नसून, अनेक अधिकाऱ्यांना १०३ ही हेल्पलाईन सुरू आहे का, ते विचारावे लागत आहे. तसेच या हेल्पलाईनचा प्रचार आणि प्रसार पोलीस ठाण्याचे आवार सोडल्यास कुठेच दिसत नाही. त्यामुळे कोण संपर्क करणार, असा प्रश्न येतोच. तसेच सिंधुदुर्गमध्ये महिला अत्याचारांचे प्रमाण इतर जिल्ह्याच्या तुलनेत कमी असल्याने नागरिकांचे संपर्काचे प्रमाणही कमी असल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणी बोगस तक्रारही कोण करत नाही. तशी नोंदही आढळत नाही. एखादा फोन आलाच, तर त्याची खात्रीही करण्यात येते.१०३ हा हेल्पलाईन नंबर असून, यावर संपर्क केला तर संपर्क पोलीस मुख्यालयाच्या दूरध्वनीवर जात असल्याने तेथून नागरिकांना योग्य प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते. यासाठी खास ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशनही केले. त्यावेळी तेथे असलेल्या कर्मचाऱ्याने योग्य उत्तर देत सावंतवाडी पोलिसांनाही याची माहिती दिली. तसेच मुख्यालयात सिंधदुुर्ग जिल्ह्यासाठी महिला अत्याचार विरोधी कक्ष असल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. जिल्ह्यात कुठेही घटना घडली की, स्थानिक पोलीस ठाण्यांना याची कल्पना दिली जाते. त्यानंतर तेथील अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी लागलीच दाखल झाल्याचे दिसून आले आहे.


‘लोकमत’च्या स्टिंगने पोलीस सतर्क
सावंतवाडीत युवकांचे टोळके मोती तलावाच्या काठी महिलेची छेड काढून पळाले, अशा प्रकारचा दूरध्वनी मुख्यालयात केल्यानंतर पोलिसांनी याची लागलीच दखल घेत स्थानिक पोलीस पाठवून देतो. तसेच घटना कुठे घडली आहे, याची माहिती घेत तत्काळ संपर्क केला. मात्र ‘लोकमत’ने त्यांना आम्ही पोलीस किती सतर्क आहेत, हे बघण्यासाठी हा कॉल केला असल्याचे सागितल्यानंतर त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
हेल्पलाईनमुळे तक्रारदारास फायदा : पाटील
महिला अत्याचार विरोधी हेल्पलाईन ओरोस येथे सुरू झाली आहे. त्या कक्षाच्या प्रमुख पोलीस उपनिरीक्षक एन. आर. पाटील या आहेत. त्या सायंकाळी उशिरा कार्यालयात हजर नसल्या, तरी त्यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क केल्यानंतर त्यांनी हेल्पलाईनच्या कामाबाबत माहिती दिली. तसेच या हेल्पलाईनचा तक्रारदारांना अधिक फायदा होणार असून, आम्ही या हेल्पलाईनचा प्रसार करीत असल्याचे यावेळी पाटील यांनी स्पष्ट केले.

Web Title: Landline's supportline instead of mobile phone support line

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.