दुचाकी-डंपर अपघातानंतर ग्रामस्थ आक्रमक
By admin | Published: January 13, 2016 10:22 PM2016-01-13T22:22:17+5:302016-01-13T22:22:17+5:30
आरोंद्यात तणाव : सहा तास मायनिंग वाहतूक रोखली; तोडग्यानंतर दुपारी सुरळीत
आरोंदा : मळेवाड-सावंतवाडी रस्त्यावरील फॉरेस्ट चौकीनजीकच्या वळणावर मंगळवारी डंपरने दुचाकीला धडक दिल्याने आरोंद्यातील युवक गंभीर जखमी झाला. भरधाव डंपरमुळे वारंवार अपघात होत असल्याने आरोंदावासीयांनी बुधवारी सकाळी सात वाजल्यापासून मायनिंग वाहतूक रोखून धरली. त्यामुळे येथील वातावरण तणावपूर्ण बनले. डंपर चालक-मालक संघटनेकडून अपघातग्रस्त युवकाला मदत करण्यासह पोलीस कारवाईच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
सावंतवाडी-मळेवाड मार्गावरील घोडेमुख नजीकच्या वळणावर मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. यात दुचाकीस्वार सिद्धेश अनंत गडेकर (वय २२) हा युवक गंभीर जखमी होऊन, त्याचा उजवा हात निकामी झाला. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी आरोंदावासीय मोठ्या संख्येने जमा झाले. यावेळी वाहतूक रोखण्यात आली; पण जखमी गडेकर याला बांबुळीला हलविण्यासाठी सर्वांनी हा बंद मागे घेतला. त्यानंतर पोलिसांकडून काहीच कारवाई न झाल्याने आरोंदावासीयांतून संतापाची लाट उसळली.
संतप्त आरोंदा ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत आरोंदा लाठी येथे डंपर वाहतूक अडविली होती. बुधवारी सकाळी सात वाजल्यापासून मायनिंग वाहतूक करणाऱ्या डंपरच्या मोठ्या रांगा मार्गावर लागल्या. यावेळी डंपरधारक व ग्रामस्थ यांच्यात वादावादी झाली, पण ग्रामस्थांनी आक्रमक होत, अपघातातील जखमीचे काय? असा सवाल केला. आरोंदा येथे ग्रामस्थांनी डंपर अडविल्याचे कळताच सावंतवाडी पोलीस उपनिरीक्षक दिलीप वेडे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. यातून मार्ग काढूया, पण वाहतूक सुरळीत करा, असे आवाहन त्यांनी केले. ग्रामस्थांनी त्यांचे काहीही न ऐकता बेपर्वा डंपरचालकांवर काय कारवाई केली, जखमी युवकाचा हात निकामी झाला आहे, त्याच्या उपचाराचे व पुढील भवितव्याचे काय? अशा प्रश्नांची सरबत्ती केली. जोपर्यंत वाहतूक संघटनेच्या व्यवस्थापनाकडून योग्य तोडगा निघत नाही, तोपर्यंत ट्रक वाहतूक अडविली जाईल, यावर ग्रामस्थ ठाम होते.
दुपारी साडेबाराच्या सुमारास डंपर वाहतूक संघटना व ग्रामस्थ यांच्यात चर्चा सुरू झाली. अर्धा तासाच्या बैठकीत अपघातग्रस्ताला शक्य तेवढी मदत, डंपरच्या बेदरकार वाहतुकीला लगाम घालण्याचा तोडगा निघाल्यानंतर दुपारी एक वाजण्याच्या सुसारास डंपर वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली. दरम्यान, सिद्धेशच्या हातावर
बांबोळी-गोवा येथे बुधवारी सकाळी शस्त्रक्रिया करण्यात आली. (प्रतिनिधी)
वेग त्यांचा, जीव मात्र आमचा..
पहाटेपासून वाहतूक रोखून धरलेल्या आरोंदावासीयांचा या आंदोलनात आक्रमकपणा कमालीचा वाढला होता. पोलिसांनी ग्रामस्थांना छेडले असता ग्रामस्थांनी भरधाव वेगाला पोलीस ब्रेक लावणार तरी कधी, असा सवाल केला. तसेच वेग वाढतो त्यांचा, जीव जातो आमचा... अशा आकांताने पोलिसांना नि:शब्द केले.