खारेपाटण संभाजीनगरमध्ये भूस्खलन, काजूबागेचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 05:06 PM2020-08-10T17:06:57+5:302020-08-10T17:08:22+5:30
गेले चार ते पाच दिवस मुसळधार कोसळत असलेल्या वादळी पावसामुळे खारेपाटण संभाजीनगर येथील रहिवासी मधुकर शंकर गुरव यांचे मोठे नुकसान झाले आहे.
खारेपाटण : गेले चार ते पाच दिवस मुसळधार कोसळत असलेल्या वादळी पावसामुळे खारेपाटण संभाजीनगर येथील रहिवासी मधुकर शंकर गुरव यांचे मोठे नुकसान झाले आहे.
मुंबई-गोवा महामार्गाला लागून असलेल्या संभाजीनगर येथील फळबागायती असलेल्या त्यांच्या सुमारे १५ गुंठे जमिनीत भूस्खलन झाले. या जमिनीला भेगा व तडे जाऊन ती बाधित झाली आहे. यात काजू, खैर व जंगली झाडांचे नुकसान झाले आहे.
या घटनेची माहिती मिळताच खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत, ग्रामविकास अधिकारी जी. सी. वेंगुर्लेकर, तलाठी रमाकांत डगरे यांनी तातडीने भूस्खलन झालेल्या ठिकाणी भेट देऊन नुकसानग्रस्त बागेची व जागेची पाहणी केली. पंचयादी घालून नुकसानीचा अहवाल शासनाकडे पाठविणार असल्याचे तलाठी रमाकांत डगरे यांनी यावेळी सांगितले.
खारेपाटण संभाजीनगर येथील मुंबई-गोवा महामार्गाला लागून असलेली डोंगर भागातील सर्व्हे क्र. ३/२ ची जमीन मधुकर गुरव यांच्या मालकीची आहे. या जमिनीमध्ये त्यांनी काजू कलमे लावली आहेत. या व्यतिरिक्त खैर व इतर झाडेदेखील होती.
परंतु, मुंबई-गोवा महामार्गाच्या कामात गुरव यांच्या या जमिनीच्या काही डोंगर भागातील मातीचे उत्खनन करून दुसऱ्या ठिकाणी भराव करण्यासाठी जेसीबीच्या सहाय्याने तो तोडण्यात आला होता.
जमिनीचा डोंगर भाग हा १५० फूट लांब व जमिनीच्या पातळीपासून सुमारे ३० फूट उंचीएवढा सरळ उभा कापण्यात आला होता. त्यामुळे तो उंच दरडीसारखा धोकादायक झाला होता. भूस्खलन झाल्याने गुरव यांचे मोठे नुकसान झाले आहे.