Sindhudurg: करूळ घाटात दरड कोसळली, नवीन संरक्षक भिंतीला फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2024 12:33 PM2024-07-20T12:33:18+5:302024-07-20T12:35:54+5:30
१०० मीटरहून अधिक रस्ता व्यापला : मार्ग बंद असल्यामुळे परिणाम नाही
वैभववाडी : रुंदीकरण व काँक्रीटीकरणासाठी बंद असलेल्या करूळ घाटात गुरुवारी (दि. १८) सायंकाळी अक्षरशः डोंगरच रस्त्यावर आला आहे. त्यामुळे जवळपास १०० मीटरचा रस्ता व्यापला गेला असून, नव्याने बांधलेल्या संरक्षक भिंतीचा कठडाही तुटला आहे. यावरून हा घाट मार्ग आणखी काही महिने वाहतुकीसाठी बंद राहणार, हे स्पष्ट होऊ लागले आहे.
तळेरे-कोल्हापूर महामार्गावरील करूळ घाट मार्ग रुंदीकरण व काँक्रीटीकरणाच्या कामासाठी २२ जानेवारीपासून वाहतुकीस बंद आहे. घाट मार्गाचे रुंदीकरण करताना डोंगराकडील बाजू काटकोनात तोडण्यात आली आहे. त्याचे परिणाम आता दिसायला सुरुवात झाली आहे. डोंगराचा बराचसा भाग तोडल्यामुळे संपूर्ण डोंगरच अस्थिर बनले आहेत. पाऊस सुरू झाल्यापासून या घाट रस्त्यात जागोजागी दरडी कोसळत आहेत.
मात्र, या घाट रस्त्याची वाहतूक बंद असल्यामुळे त्यांचा परिणाम जाणवत नसला तरी भविष्यातील गंभीरता स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे करुळ घाट मार्गाने सद्य:स्थितीत वाहतूक सुरू करणे किती जोखमीचे आहे हे यावरून स्पष्ट होत आहे.
गुरुवारी सायंकाळी तालुक्यात अति मुसळधार पाऊस सुरू होता. त्याच दरम्यान सात वाजण्याच्या सुमारास डोंगराचा निम्मा भाग रस्त्यावर कोसळला. मोठेमोठे दगड, झाडे आणि मातीच्या ढिगाऱ्याने जवळपास १०० मीटर रस्ता व्यापला आहे. मोठे दगड संरक्षक भिंतीला आदळल्यामुळे नव्याने बांधलेली काँक्रीटची भिंत तुटली आहे. ठेकेदार कंपनीकडून तो ढिगारा हटविण्याचे काम सुरू आहे. घाट रस्त्यात सतत दरडी कोसळत असल्यामुळे येणाऱ्या गणपती उत्सवापूर्वी या घाट मार्गाने वाहतूक सुरू करणे धोकादायक ठरणार आहे.
करूळ घाटात दरड कोसळली असून, आतापर्यंतची ही सर्वांत मोठी दरड आहे. या दरडीने १०० मीटरपर्यंतचा रस्ता व्यापला आहे. दरड हटविण्याचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. याबाबतची माहिती वरिष्ठ कार्यालयाला देण्यात आलेली आहे. -अतुल शिवनीवार, उपअभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरण