डच वखार मोजतेय अंतिम घटका
By Admin | Published: October 11, 2015 08:53 PM2015-10-11T20:53:18+5:302015-10-12T00:57:31+5:30
सोळाव्या शतकातील वारसा : पुनरुज्जीवन केल्यास वेंगुर्ले शहराच्या लौकिकात भर
प्रथमेश गुरव- वेंगुर्ले 0वेंगुर्ले शहरातील डच व्यापाऱ्यांनी येथे उभारलेली डच वखार भग्नावस्थेत असून, ही वास्तू पुन्हा सुस्थितीत उभी राहिल्यास पुढील पिढीला ऐतिहासिक वास्तूचा वारसा लाभेलच; त्याचबरोबर शहराच्या लौकिकात भरही पडेल. शिवाय ही वास्तू पाहण्यासाठी पर्यटकही मोठ्या प्रमाणावर येतील व स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल.
वेंगुर्ले बंदर मार्गावर, पोलीस वसाहतीनजीक असलेल्या या पुरातन इमारतीच्या जागी नवीन वास्तू बांधण्यासाठी २०११ मध्ये हॉलंडमधील आर्किटेक्ट व राजकीय नेत्यांनी पाहणी केली. वखार पुन्हा उभारून ते पर्यटनस्थळ बनविण्याचा मानस व्यक्त केला होता. मात्र, चार वर्षे उलटूनही या डच वखारीचे पुनरुज्जीवन होण्यासाठी कोणतीही पावले उचलली गेली नाहीत. या डच वखारीचे पुनरुज्जीवन झाल्यास देश-विदेशातील पर्यटक दरवर्षी ही डच वखार पाहण्यास येतील व पर्यायाने वेंगुर्लेचा पर्यटनातून विकास साधता येईल.
भारतातील तत्कालीन अनेक राजकीय मुत्सद्दी वेंगुर्लेतील या डच वखारीत येऊन डचांशी राजकीय खलबते करीत असत, तर विजापूरचा आदिलशाही सरदार मुस्ताफा खान, बलुत खान, अफजल खान हे आपल्या सैन्यासह येथे या वखारीत येऊन गेले होते. १६ व्या शतकात डच व्यापाऱ्यांनी येथे विजापूरच्या आदिलशहाच्या परवानगीने तटबंदीयुक्त वखार बांधली. त्याकाळी वेंगुर्ले हे एक प्रसिद्ध व्यापारी बंदर होते. आज येथे ऐतिहासिक डच वखार आहे. तिथपर्यंत खाडीचा विस्तार होता. या वखारीच्या समोरच खाडीत मालाने भरलेली गलबते थांबायची.
१६६० ते १६७० या दरम्यान या वखारींची सुरक्षिततेच्या दृष्टीने फार मोठी दुरुस्ती करण्यात आली. १६८०मध्ये या वखारींसमोर एक भला मोठा खंदक खोदण्यात आला. त्यावर एक पूल बांधण्यात आला. शत्रूने डच वखारीवर हल्ला केल्यास खंदकावरील हा पूल वर उचलला जात असे, अशी या पुलाची रचना करण्यात आली होती.
त्याकाळी वेंगुर्ले बंदरातून पार्शिया, जपान देशापर्यंत व्यापार चाले. डच वखारीच्या उभारणीनंतर फार मोठ्या प्रमाणात व्यापार वाढून वेंगुर्ले शहराची प्रगती होत गेली. १६८२च्या हल्ल्यानंतर डचांच्या मुख्य ठाण्याच्या आदेशानुसार मालवण येथे छोेटी वखार बांधण्यात आली व डच वेंगुर्लेहून गेले. त्यांना कायमचे वेंगुर्ले सोडावे लागले. त्यानंतर ही डच वखार सावंतवाडी संस्थानाच्या ताब्यात गेली व नंतर ब्रिटिश आमदानीत ती ब्रिटिशांच्या ताब्यात गेली. इंग्रजांनी आपल्या राजवटीत या डच वखारीत महालकरी कार्यालय ठेवले होते.
स्वातंत्र्योत्तर काळातही तेथे महालकरी कार्यालय व न्यायालय होते. १९६० मध्ये येथील सर्व सरकारी कचेऱ्या वेंगुर्ले येथे कॅम्प भागात नवीन इमारतीत हलविण्यात आल्या. १९४७मध्ये ही डच वखार भारतीय पुरातत्व विभागाच्या ताब्यात गेली. त्यानंतर पुरातत्व खात्याने या वास्तूकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले.
या इमारतीची पडझड रोखण्याचे काम कोणीच केले नाही. आता ही इमारत पूर्णपणे भग्नावस्थेत कशी तरी उभी आहे. या इमारतीचे पुनरुज्जीवन केंद्रातील भाजप सरकारने केल्यास, या डच वखारीमुळे पुन्हा एकदा वेंगुर्लेचा विकास होईल.