‘सिंधुदुर्ग’च्या आराखड्याचे काम अंतिम टप्प्यात
By admin | Published: December 6, 2015 11:57 PM2015-12-06T23:57:33+5:302015-12-07T00:14:12+5:30
रेल्वेमंत्र्यांना आराखडा : शिवरायांच्या पराक्रमाचे साडेतीनशेव्या वर्षात पदार्पण
मालवण : किल्ले सिंधुदुर्ग हा गेल्या ३५० वर्षाहून अधिक काळ समुद्र्राच्या लाटांचे तडाखे आणि जोरदार वाऱ्यांशी सामना करत दिमाखात उभा आहे. किल्ल्याच्या जतन आणि संवर्धनासाठी येथीलच ‘किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समिती’ने नेहमीच पुढाकार घेतला आहे. गेली नऊ वर्षे ही समिती किल्ले सिंधुदुर्ग येथे विविध उपक्रम राबवित आहे. २२ एप्रिल २०१६ रोजी किल्ले सिंधुदुर्ग ३५० व्या वर्षात पदार्पण करत असून, यानिमित्ताने प्रेरणोत्सव समितीच्यावतीने किल्ल्याचा पर्यटनदृष्ट्या सर्वसमावेशक आराखडा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे सादर केला जाणार आहे. या आराखड्याचे काम अंतिम टप्प्यात आले असल्याची माहिती प्रेरणोत्सव समितीचे नूतन अध्यक्ष गुरुनाथ राणे यांनी ‘लोकमत’ला दिली.
गच्च अंधारात दिसू न शकणारे किल्ल्याचे सौंदर्य उजळवण्याचा विडा भारतीय पुरातत्त्व खात्याने सिंधुदुर्ग किल्ले प्रेरणोत्सव समितीच्या सहाय्याने उचलला आहे. यासाठी किल्ल्याभोवती वॉटरप्रुफ दिवे बसविण्यात येणार आहेत.
किल्ले सिंधुदुर्गचा ३५० वा वर्धापन दिन डोळ्यासमोर ठेऊन किल्ल्याची संपूर्ण डागडुजी व भव्यदिव्यतेसाठी आराखडा करण्याचे काम भारतीय पुरातत्व विभाग व तज्ज्ञ मंडळींकडून करण्यात येत आहे. पर्यटनदृष्ट्या सर्वसमावेशक व परिपूर्ण असा हा आराखडा असणार आहे.
शहरात ऐतिहासिकतेचे वातावरण निर्माण करणार
प्रेरणोत्सव समिती सामाजिक कार्य करत असताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अभेद्य किल्ले सिंधुदुर्गच्या रक्षणासाठी नेहमीच पुढे राहिली आहे. एप्रिल २०१६ साली किल्ला ३५० व्या वर्षात पदार्पण करत आहे. त्यामुळे प्रेरणोत्सव समितीने आत्तापासून विविध कार्यक्रमांचे नियोजन केले आहे.
३५० व्या वर्षानिमित्त सामाजिक कार्यक्रमांची मेजवानी सिंधुदुर्गवासीयांना दिली जाणार आहे. त्यासाठी समितीच्यावतीने शहरात ऐतिहासिकतेचे वातावरण निर्माण करण्यात येणार आहे. सर्व सभासदांनीही महाराजांचा इतिहास सर्वदूर पोहोचवण्यासाठी कंबर कसली आहे, असे गुरुनाथ राणे यांनी यावेळी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)
प्रेरणोत्सव समितीच्या अध्यक्षपदी गुरुनाथ राणे यांची निवड झाली आहे. या कार्यकारिणीत उपाध्यक्ष दत्तात्रय नेरकर, ज्योती तोरसकर, सचिव विजय केनवडेकर, सहसचिव गणेश कुशे, खजिनदार हेमंत वालकर, सदस्य भाऊ सामंत, मुकेश बावकर, रामचंद्र काटकर, नरेश कालमेथर, वैशाली शंकरदास, सचिन गोवेकर, लक्ष्मीकांत कांबळी, रविकिरण तोरसकर, प्रदीप वेंगुर्लेकर, मानद सदस्य म्हणून राजीव परुळेकर, भूषण साटम यांचा समावेश आहे.
प्रेरणोत्सव समिती अध्यक्ष गुरुनाथ राणे यांची माहिती.
आराखडा केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे सादर करणार.
सिंधुदुर्गवासीयांना मिळणार सामाजिक कार्यक्रमांची मेजवानी.