अमर रहे! शहीद सुभेदार सुनील सावंत यांना अखेरची सलामी; पार्थिव घरी पोहचताच पत्नीसह मुलांनी फोडला टाहो
By अनंत खं.जाधव | Published: September 16, 2023 04:49 PM2023-09-16T16:49:04+5:302023-09-16T17:29:12+5:30
सावंतवाडी : १९ मराठा लाईट इन्फंट्री बटालियनचे सुभेदार सुनील राघोबा सावंत (46, रा. कारिवडे भैरववाडी) हे बुधवारी पंजाब येथे ...
सावंतवाडी : १९ मराठा लाईट इन्फंट्री बटालियनचे सुभेदार सुनील राघोबा सावंत (46, रा. कारिवडे भैरववाडी) हे बुधवारी पंजाब येथे परेड सुरू असताना शहीद झाले. त्यांचे पार्थिव आज, शनिवारी कारिवडे या त्यांच्या मूळ गावी आणण्यात आले. यावेळी संपूर्ण गाव शोकसागरात बुडाला होता. यावेळी ग्रामस्थ जिल्हा प्रशासन, सैनिक तसेच पोलिसांच्या वतीने गावातील शाळेपासून त्याच्या घरापर्यंत साश्रू नयनात मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी जय जवान जय किसान, सुभेदार सुनील सावंत अमर रहे अमर रहे अशा घोषणा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. पार्थिव घरी पोचताच पत्नीसह मुलांनी नातेवाईकांनी एकच टाहो फोडला. यावेळी सर्वाचे मन हेलावून गेले होते. घरी पोचल्यानंतर पार्थिवाचे कुटुंबाने अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर पोलिस व सैनिक याच्या बॅडवर अंत्ययात्रा काढत वीर मातेच्या सुपुत्रावर साश्रू नयनांत अंत्यसंस्कार करण्यात आले.
सुभेदार सुनील सावंत हे युनिट पंजाबमध्ये कार्यरत होते. नेहमीप्रमाणे जवानांची परेड सुरू होती. त्यावेळी धावताना सुभेदार सावंत चक्कर येऊन खाली पडले. त्यातच ते शहीद झाले. याबाबत सावंत कुटुंबियांना माहिती देण्यात आली. त्याचे काही नातेवाईक पंजाबकडे रवाना झाले त्यानंतर तेथील सर्व सोपस्कार पूर्ण करून शहीद सुनिल सावंत यांचे पार्थिव शूक्रवारी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. दिल्ली, गोवा मार्गे त्याच्या मूळ गावी कारिवडे येथे आज, दुपारच्या सुमारास त्याचे पार्थिव दाखल झाले.
जिल्हा प्रशासन तसेच कारिवडे सरपंच आरती माळकर यांनी सुभेदार सावंत यांना श्रध्दांजली अर्पण केली. त्यानंतर शाळेपासून घरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी शाळकरी मुले, ग्रामस्थ, माजी सैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पार्थिव घरी पोहचताच पत्नी अन् मुलांचा आक्रोश हदय पिळवटून टाकणारा होता. काही वेळातच पार्थिव अंतिम संस्कारासाठी हलविण्यात आले.
जिल्हा प्रशासनाकडून निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी पुष्पचक्र अर्पण केले. तर यावेळी प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर तहसिलदार श्रीधर पाटील, पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, माजी आमदार राजन तेली, प्रविण भोसले, वसंत केसरकर, महेश सारंग, रविंद्र मडगावकर, रूपेश राऊळ, सुनिल राऊळ, मंगेश तळवणेकर, आनंद तळवणेकर आदीसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ, माजी सैनिक, सहभागी झाले होते.