गळ्यामध्येच गंधार होता, हिंदुस्थानला पोरकं करुन लता दिदी गेल्या; केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी वाहिली श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2022 06:06 PM2022-02-06T18:06:06+5:302022-02-06T18:06:23+5:30

लता मंगेशकर यांच्या निधानानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Lata Mangeshkar went to Hindustan as an orphan; Union Minister Narayan Rane pays homage | गळ्यामध्येच गंधार होता, हिंदुस्थानला पोरकं करुन लता दिदी गेल्या; केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी वाहिली श्रद्धांजली

गळ्यामध्येच गंधार होता, हिंदुस्थानला पोरकं करुन लता दिदी गेल्या; केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी वाहिली श्रद्धांजली

Next

सिंधुदुर्ग :  लता मंगेशकर यांच्या निधानानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “ ऐ मेरे वतन के लोगो,” अशी साद घालून ज्यांनी अवघा हिंदुस्थान राष्ट्रप्रेमाने एकवटला त्या भारतरत्न लता मंगेशकर आपल्यात आता नाहीत यावर विश्वास बसत नाही. जरी त्यांनी नव्वदी पार केली असली तरी त्या कोरोनाने आजारी पडेपर्यंत उत्तमरित्या कार्यरत होत्या आणि महत्वाच्या घटना व विषयांबद्दल आपले मत व्यक्त करीत असत. संपूर्ण हिंदुस्थानसाठी त्या “लता दिदी” होत्या.

दिदींचं बालपण कष्टात गेलं. लहानपणीच मोठया कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या कोवळ्या खांद्यांवर अचानक आली. परिस्थितीचा खंबीर सामना करीत त्यांनी वडिलोपार्जित संगीताच्या संस्काराचा वारसा पुढे नेला आणि त्याच वेळी आपल्या भावंडांचं आई-वडिलांच्या मायेने संगोपन करुन मंगेशकर घराणे नावारुपास आणलं.

भारतीय संगीताला, विशेषत: चित्रपट संगीताला त्यांनी आपल्या शालीन, लडिवाळ स्वरांनी वेड लावलं. त्यांची हिंदी चित्रपटातली गाणी एवढी गाजली की, त्यांनी स्वत: संगीतकार म्हणून दिलेली मराठी गाण्यांची देणगी व भक्ती संगीतातील अलौकिक रचनांचा अविट नजराणा झाकोळला गेला. त्या सर्वोत्कृष्ट गायिका तर होत्याच, त्याच बरोबरीने त्यांचे व्यक्तिमत्व सुध्दा प्रगल्भ, शालीन व महान होते. देशाच्या सर्वोच्च भारतरत्न या सन्मानाप्रमाणे त्यांना फ्रान्सच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने सुध्दा गौरविले गेले होते. लंडनच्या अल्बर्ट हॉलमध्ये आपली कला सादर करणाऱ्या त्या पहिल्या हिंदुस्थानी कलाकार होत्या.

लता दिदींच्या गळ्यामध्येच गंधार होता व त्यांचं गाणं ऐकताना देवी सरस्वतीच्या साक्षात दर्शनाचा अनुभव मिळावयाचा. लता दिदींच्या जाण्यामुळे देश पोरका झाला आहे. दिदींच्या स्वर्गीय प्रवासासाठी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि मंगेशकर कुटुंबियांच्या दुःखात सहसंवेदना व्यक्त करतो.

Web Title: Lata Mangeshkar went to Hindustan as an orphan; Union Minister Narayan Rane pays homage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.