उशिराने सुचलेले शहाणपण
By admin | Published: August 16, 2015 09:57 PM2015-08-16T21:57:19+5:302015-08-17T00:17:41+5:30
भीमला आंबेरीतून कर्नाटक येथे मंगळवारी प्रशिक्षणासाठी नेण्यात आले. ही घटना...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेली १३ वर्षे दहशत माजवून तब्बल दहा लोकांचे प्राण घेतलेल्या रानटी हत्तींना अवघ्या पाच दिवसांत जेरबंद करण्याचे अभूतपूर्व काम वनविभागाने कर्नाटक येथील पथकाच्या साहाय्याने लिलया पेलले होते. त्यामुळे त्यावेळी वनविभागाच्या पथकाचे सर्वांनीच तोंड भरून कौतुक केले. हत्तींनी येथील लोकांचे प्राण घेताना लाखो रुपयांची नुकसानीही केली होती. त्यामुळे सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला होता. मात्र, ज्यावेळी पकडलेल्या हत्तींपैकी दोन हत्तींचा महिन्याच्या फरकाने दुर्दैवीरीत्या मृत्यू झाला, त्यानंतर मात्र सर्वांनीच या घटनांबाबत हळहळ व्यक्त करताना शासनाच्या दुर्लक्षाचे हे बळी असल्याची टीकाही करायला सुरुवात केली. गणेश, समर्थ आणि भीम यापैकी गणेश आणि समर्थचा मृत्यू झाला. त्यानंतर भीमला आंबेरीतून कर्नाटक येथे मंगळवारी प्रशिक्षणासाठी नेण्यात आले. ही घटना म्हणजे शासनाला उशिराने सुचलेले शहाणपण आहे, हे स्पष्ट झाले.
कर्नाटक येथून सन २00२ साली महाराष्ट्रात म्हणजे दोडामार्गात दाखल झालेल्या पाहुण्यांनी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा पादाक्रांत करत १२ वर्षे सिंधुदुर्गावर राज्य केले. या कालावधीत दहाजणांचे बळीही गेले, तर काही लोक जखमीही झाले. त्यातच माडबागायती, शेती, केळीच्या बागा यांचे लाखो रुपयांचे नुकसानही या पाहुण्यांनी केले. येथील जनता त्यांच्या त्रासाने कंटाळली होती. त्यानंतर या हत्तींना हाकलवून लावण्यासाठी एकवेळा हत्ती हटाओ मोहीम राबविण्यात आली होती, तर त्यानंतर सिंधुदुर्गचे तत्कालीन उपवनसंरक्षक नरेश झुरमुरे यांच्या मार्गदर्शनाखाली हत्ती पकड मोहीमही राबविण्यात आली होती. मात्र, या दोन्ही मोहिमेत हत्तींना हाकलवून लावणे असेल किंवा पकडणे असेल शासनाला पर्यायाने वनविभागाला जमले नाही. हत्ती पकड मोहिमेदरम्यान, एका हत्तीचे निधन झाल्यामुळे ती मोहीमही बारगळली होती. त्यातच गेल्या तीन-चार वर्षांत हत्तींचा त्रास दिवसेंदिवस वाढतच चालला होता. त्यामुळे जनताही आक्रमक झाली होती.
गतवर्षी राज्यकर्ते बदलले. देशात भाजप आणि राज्यात युतीचे शासन आल्यानंतर सिंधुदुर्गात ठाण मांडून असणाऱ्या तीन हत्तींना पकडण्यासाठी पुन्हा मोहीम राबविण्याचे जाहीर करण्यात आले. हत्तींना पकडायचे असेल तर मग कर्नाटकवर अवंलबून राहावे लागणार हे स्पष्टच होते. कारण राज्यात हत्तींना पकडण्याचा प्रश्न तसा पहिल्यांदाच उद्भवला होता. त्यामुळे कर्नाटक शासनाला विनवणी करण्यात आली.
त्यांच्याकडे पैसे भरल्यानंतरच कर्नाटक येथून पथक पाठविण्यात आले. मात्र, ते पथक एवढे निष्णात होते की, त्यांनी अवघ्या पाच दिवसांतच मोहीम फत्ते केली. माणगाव खोऱ्यात ठाण मांडून बसलेल्या तिन्ही हत्तींना डॉ. उमाशंकर यांच्या पथकाने जेरबंद केले. मग त्याच दरम्यान या हत्तींना पकडल्यानंतर ठेवणार कुठे, असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यातच त्या तीन हत्तींना आंबेरी येथील वनविभागाच्या तळावर क्रॉल उभारून डांबण्यात आले.
ज्यावेळी या हत्तींना पकडले, त्याचवेळी जर त्यांना कर्नाटक येथे नेण्यात आले असते आणि त्यासाठी लागणारा खर्च जर शासनाने त्याचवेळी कर्नाटकला दिला असता, तर हे तिन्ही हत्ती आज निश्चितच कर्नाटकात एवढ्यात प्रशिक्षण घेऊन आले असते. मात्र, आंबेरी येथे वनविभागाने उभारलेल्या अतिशय छोट्या जागेतील क्रॉलमध्ये या हत्तींना ठेवण्यात आले होते. तसेच या हत्तींची देखभाल करण्यासाठी एक माहूत आणि एक प्रशिक्षक ठेवण्यात आला. मात्र, ज्या पद्धतीने या हत्तींना येथे ठेवण्यात आले होते ती जागा, त्यांना मिळणारे खाद्य आणि त्यांच्यावर होणारे प्रशिक्षण यांचा कोणताही ताळमेळ नव्हता. परिणामी या तीन हत्तींपैकी समर्थ आणि गणेश या दोन हत्तींचा दुर्दैवीरीत्या मृत्यू झाला.
त्यामुळे तीन पैकी केवळ भीम हा एकमेव हत्ती येथे शिल्लक राहिला. मात्र, या हत्तीला जर तसेच येथे ठेवले असते, तर त्याचाही मृत्यू होण्याची शक्यता असल्याने वनविभागासह शासनाला पुन्हा जाग आली. त्यामुळे या हत्तीला येथून प्रशिक्षणासाठी कर्नाटकात हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या. मात्र, प्रत्येकवेळी ज्यावेळी महाराष्ट्रात कर्नाटकाकडे विषय जायचा, त्यावेळी कर्नाटक सरकार आधी त्याबाबतच्या खर्चाची रक्कम वर्ग करा, मगच कार्यवाही करतो असे फर्मान सोडायचे आणि त्यांचे फर्मान पूर्ण झाल्यानंतरच कार्यवाही व्हायची. त्याप्रमाणे भीम हत्तीच्या प्रशिक्षणाचा खर्च वर्ग केल्यानंतर त्याचा कर्नाटकला जाण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यानुसार मंगळवारी ट्रकमधून भीमला कर्नाटककडे पथकाच्या साहाय्याने नेण्यात आले. आता कर्नाटकात या हत्तीला प्रशिक्षण देण्यात येईल आणि त्यानंतर त्याला पुन्हा महाराष्ट्राच्या ताब्यात देण्यात येईल. या सहा महिन्यांच्या कालावधीत हत्ती पकडल्यानंतर आंबेरी येथे शासनाने खर्च करून उभारलेल्या क्रॉलमध्ये दोन हत्तींचा मृत्यूही झाला आणि त्यामुळे हत्ती पकड मोहीम यशस्वी करून वाहवा होणाऱ्या शासनाची दोन हत्तींच्या मृत्यूमुळे पुन्हा नाचक्कीही होऊ लागली.
हत्तींना पकडून त्यांना प्रशिक्षण देण्याचे तळ महाराष्ट्रात नाही. त्यामुळे पकडलेल्या हत्तींना त्याचवेळी कर्नाटक येथे नेणे आवश्यक होते. मात्र, त्यासाठी होणाऱ्या खर्चाकडे पाहून म्हणा किंवा त्याबाबतचा धोरणात्मक निर्णय शासनकर्त्यांकडून त्यावेळी न झाल्यामुळे दोन हत्तींचे प्राण गेले. पकडलेल्या हत्तींना प्रशिक्षित करून हत्तीग्राम बनविण्याचा संकल्प राज्यकर्त्यांचा होता. मात्र, त्यासाठी या हत्तींना पहिल्यांदा प्रशिक्षित करणे गरजेचे होते.
हत्ती पकड मोहीम ज्या पद्धतीने अगदी सुयोग्य नियोजन करून राबविण्यात आली, त्याप्रमाणे पकडलेल्या हत्तींना प्रशिक्षित करण्याबाबतचे नियोजन त्यावेळीच राज्यकर्त्यांनी केले असते तर पकडल्यानंतर गेल्या सहा महिन्यांत रानटी हत्ती प्रशिक्षित होऊन राज्यकर्त्यांची हत्तीग्राम बनविण्याबाबतची सुप्त इच्छाही पूर्ण झाली असती. मात्र, यासाठी योग्य निर्णय झाला नाही. दोन हत्तींचा प्राण गेल्यानंतर शासनकर्त्यांना आणि प्रशासनाला जाग आली. तीच तत्परता जर मोहिमेनंतर दाखविण्यात आली असती, तर कदाचित तिन्ही हत्ती आजतागायत पुन्हा सिंधुदुर्गात प्रशिक्षित होऊनदेखील आले असते. हे वास्तव आहे आणि ते आता नाकारूनही चालणार नाही.