साहित्य संमेलनाचा ग्रंथदिंडीने प्रारंभ
By admin | Published: October 24, 2015 11:21 PM2015-10-24T23:21:36+5:302015-10-24T23:21:36+5:30
कुडाळ संत राऊळ महाराज विद्यालय : ढोल ताशांच्या गजरात, मर्दानी खेळाच्या प्रात्यक्षिकांनी परिसर दुमदुमला
कुडाळ : मोठ्या उत्साहात, ढोल ताशांच्या गजरात कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य संमेलनाची शनिवारी सायंकाळी कुडाळ शहरात ग्रंथदिंडीने सुरूवात झाली असून रविवारी सकाळी या संमेलनाचे उद्घाटन कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालय येथे होणार आहे.
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग साहित्य संमेलनाला शनिवारी सायंकाळी कुडाळ शहरातून निघालेल्या ग्रंथदिंडीने प्रारंभ झाला.
दीडशे वर्षाची परंपरा असलेल्या टोपीवाला वाचनालयाकडून ग्रंथदिंंडीला सुरूवात होऊन आरती प्रभू साहित्य नगरीत सांगता झाली. या ग्रंथदिंडीत चित्ररथ, मुलांच्या मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. त्यानंतर संमेलनस्थळी कै. तन्मय मधुभाई कर्णिक रंगावली प्रदर्शन तसच अॅड. डी. डी. देसाई ग्रंथदालनाचं उद्घाटन करण्यात आले. यावेळी संमेलनाध्यक्ष विष्णू सूर्या वाघ, जिल्हाध्यक्ष मंगेश मसके आदी मान्यवर उपस्थित होते. उद्या सकाळी संमेलनाचे उद्घाटन होणार असून कवी आणि नाटककार विष्णू सूर्या वाघ हे या संमेलनाचे अध्यक्षपद भूषविणार आहेत. पुस्तक प्रदर्शन, मान्यवरांचे सत्कार तसेच कवी संमेलन असे कार्यक्रम होऊन सायंकाळी संमेलनाची सांगता होणार आहे.
या ग्रंथदिंडीला जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई, कवी रूजारिओ पिन्टो, चंदु शिरसाट, मंगेश मसगे, आनंद मर्गज, वृंदा कांबळी, केदार सामंत, उमेश गाळवणकर, राजन पांचाळ, मिलिंद देसाई, अजित फाटक, समीर तारी व इतर साहित्यिक व साहित्यप्रेमी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
आज संमेलनाचे उद्घाटन : दीडशे वर्षाची परंपरा
४उद्या (दि. २५ रोजी ) सकाळी संमेलनाचे उद्घाटन होणार असून कवी आणि नाटककार विष्णू सूर्या वाघ हे या संमेलनाचे अध्यक्षपद भूषविणार आहेत.
४दीडशे वर्षाची परंपरा असलेल्या टोपीवाला वाचनालयाकडून ग्रंथदिंडीला सुरूवात होऊन आरती प्रभू साहित्यनगरीत सांगता झाली.