धक्कादायक! कॅबिनेट मंत्री दीपक केसरकरांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: August 22, 2022 05:47 PM2022-08-22T17:47:16+5:302022-08-22T18:18:26+5:30

शिंदे गटातील आमदारांच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनी घेतली होती.

Lax security of school education minister Deepak Kesarkar, only one policeman from Sawantwadi to Vaibhavwadi | धक्कादायक! कॅबिनेट मंत्री दीपक केसरकरांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा

संग्रहित फोटो

googlenewsNext

सावंतवाडी : उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर पुणे येथे झालेल्या हल्ल्यानंतर शिंदे गटातील बंडखोर आमदारांची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय शासनाने घेतला. मात्र, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या बाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. रविवारी रात्री मंत्री केसरकर सावंतवाडीहून मुंबईकडे कोकणकन्या एक्स्प्रेसने जात असताना त्यांना सुरक्षाच पुरवली गेली नसल्याची बाब पुढे आली आहे. याबाबत सर्वत्र चर्चा झाल्यानंतर वैभववाडीतून एक पोलीस कर्मचारी देण्यात आला. पोलिसांच्या या हलगर्जीपणाबाबत मंत्री केसरकरांनी नाराजी व्यक्त केली.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिंदे गटातील आमदारांच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनी घेतली होती. असे असताना देखील उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यावर पुण्यात हल्ला झाला होता. या घटनेनंतर तर राज्यातील पोलीस यंत्रणा अलर्ट झाली होती. शिंदे गटातील सर्व आमदारांना विशेष सुरक्षा पुरविण्यात येणार असल्याचे ही जाहीर करण्यात आले होते. पण शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या सुरक्षेत रविवारी हलगर्जीपणा दिसून आला.

केसरकर हे रविवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले होते. त्याचे सावंतवाडी व दोडामार्ग येथे दिवसभर कार्यक्रम असल्याने त्यांना स्थानिक पोलिसांची सुरक्षा होती. मुबंईतून स्पेशल प्रोटेक्शन युनिट मधील कोणीही कर्मचारी किंवा अधिकारी आले नव्हते. हे सर्व कार्यक्रम करून मंत्री केसरकर यांनी सावंतवाडीतूनच कोकणकन्याने निघण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे ते निघाले. मात्र रेल्वेत त्याच्या सोबत स्थानिक पोलिसाची सुरक्षा नव्हतीच त्याशिवाय स्पेशल प्रोटेक्शन युनिट मधील कर्मचारीही नव्हते.

कॅबिनेट मंत्री असूनही सुरक्षा रामभरोसे

मंत्री केसरकर हे रेल्वेत चढत असतना हा प्रकार त्यांनी सावंतवाडी पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यानंतर कोरे यांनी हा प्रकार आपल्या वरिष्ठांना कळवला त्यानंतर वैभववाडीतून एक पोलीस कर्मचारी मंत्री केसरकर यांना मुंबई पर्यत देण्यात आला. मात्र सावंतवाडीतून वैभववाडी पर्यत केसरकर यांची सुरक्षा कॅबिनेट मंत्री असूनही रामभरोसे असल्याचे दिसून आले. मंत्री केसरकर यांनी आपण ही बाब मुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्या कानावर घालणार असल्याचे सांगितले.

Web Title: Lax security of school education minister Deepak Kesarkar, only one policeman from Sawantwadi to Vaibhavwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.