लक्ष्मीनारायण मिश्रा रत्नागिरीचे नवे जिल्हाधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 12:38 AM2020-02-13T00:38:13+5:302020-02-13T00:38:20+5:30
रत्नागिरी : रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची बदली झाली असून, त्यांच्या जागी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची ...
रत्नागिरी : रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची बदली झाली असून, त्यांच्या जागी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळलेले लक्ष्मीनारायण मिश्रा यांची नियुक्ती झाली आहे. बदलीचे आदेश बुधवारी दुपारी जिल्हा प्रशासनाकडे आले.
सुनील चव्हाण यांनी दि. १४ आॅगस्ट २०१८ ला रत्नागिरीचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारला होता. रत्नागिरीत येताच त्यांनी ‘मॉर्निंग वॉक’च्या माध्यमातून अनेक कार्यालयांना भेटी दिल्या. या कार्यालयांच्या समस्या जाणून घेऊन त्या दूर करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीलाच त्यांनी जिल्ह्यामध्ये स्वच्छता मोहीम पूर्णत्वाला नेली. थिबा राजवाड्याच्या दरुस्तीचे तसेच सुशोभीकरणाचे रखडलेले काम तसेच जिल्हा रुग्णालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शासकीय तंत्रनिकेतन येथील नादुरुस्त इमारतींचा प्रश्न मार्गी लावला.
जिल्हाधिकारी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या पीक कर्ज योजनेची गतवर्षी ११४ टक्के उद्दिष्टपूर्ती झाली असून, प्रधानमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रमातही गेली दोन वर्षे रत्नागिरी जिल्हा महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकावर आहे. उण्यापुºया दीड वर्षांच्या कालावधीत विविध यंत्रणांना सोबत घेऊन जास्तीत जास्त शासकीय योजना तळागाळापर्यंत नेण्यासाठी ते प्रयत्नशील राहिले आहेत. आपल्याकडे येणाºया प्रत्येक नागरिकाचे, संस्था, संघटनांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडविण्याचा ते प्रयत्न करत असल्याने ‘जनाधार’ असलेले जिल्हाधिकारी म्हणून त्यांची अल्पावधीत ओळख झाली आहे.
चिपळूण तालुक्यातील तिवरे येथील धरण फुटीच्यावेळी त्यांनी प्रशासनाच्या मदतीने अल्पकाळात तिथे पोहोचत आपद्ग्रस्तांसाठी केलेले काय उल्लेखनीय आहे. काही दिवसांपूर्वीच ते मसुरी येथील महिन्याभराचे प्रशिक्षण पूर्ण करून आल्याने त्यांच्या बदलीचे संकेत मिळत होते. प्रशिक्षणाहून परत आल्यानंतरही आघाडी सरकारने जाहीर केलेल्या महात्मा जोतिराव फुले कर्जमाफी योजनेचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत जावा, यासाठी विशेष प्रयत्नशील होते. बुधवारी त्यांच्या बदलीचे आदेश आले. बदलीचे ठिकाण अजून निश्चित झालेले नाही. त्यांच्या जागी सन २०१६ ते २०१८ या कालावधीत रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यभार सांभाळलेले आणि सध्या राज्याच्या पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त लक्ष्मीनारायण मिश्रा यांची नियुक्ती झाली आहे. लवकरच तेही नव्या पदाचा कार्यभार स्वीकारतील. मिश्रा यांनीही रत्नागिरीत दोन वर्षे काम केले असल्याने त्यांना जिल्ह्याची चांगली जाण आहे.