पणदूरमध्ये अवैध गोवा बनावटीच्या दारूवर एलसीबीची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 01:48 PM2019-04-10T13:48:45+5:302019-04-10T13:52:06+5:30
स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने मुंबई गोवा महामार्गावर बुधवारी पहाटे ५ .३० वा. पणदूर येथे अवैद्य दारू वाहतूकीवर केलेल्या कारवाई १ लाख ४२ हजार ८० रुपयांच्या
सिंधुदुर्गनगरी : स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने मुंबई गोवा महामार्गावर बुधवारी पहाटे ५ .३० वा. पणदूर येथे अवैद्य दारू वाहतूकीवर केलेल्या कारवाई १ लाख ४२ हजार ८० रुपयांच्या गोवा बनावटीच्या दारूसह ७ लाख ४२ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच अवैध दारू वाहतूक केल्याप्रकरणी वाहन चालक आंतोन लॉरेन्स रॉड्रिक्स रा. सातार्डा, सावंतवाडी याला ताब्यात घेण्यात आले आहे.
जिल्हा पोलीस अधिक्षक दिक्षितकुमार गेडाम यांच्या सुचनेनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्यावतीने गोवा बनावटीची अवैध दारू वाहतूक रोखण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक कुडाळ पणदूर अशी पेट्रोलिंग करत असताना बुधावरी (१० एप्रिल) पहाटे ५.३० वाजता मारुती स्विफ्ट कार (एमएच ०७ एजी ४६८९) सुसाट वेगाने कणकवलीच्या दिशेने जाताना या पथकाला दिसली. ही गाडी तपासणीसाठी चालकाला थांबण्याचा ईशारा करण्यात आला.
मात्र चालकाने गाडी न थाबविल्यामुळे या गाडीचा एलसीबीच्या पथकाने पाठलाग करत गाडी थांबवून तपासणी केली असता वाहनामध्ये सुमारे १ लाख ४२ हजार ८० रूपये किमतीची गोवा बनावटीची दारु अवैध आढळून आली. त्यामुळे ही दारू व ६ लाखाची कार असा मिळून एकूण ७ लाख ४२ हजार ८० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तसेच अवैध गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक केल्या प्रकरणी आंतोन लॉरेन्स रॉड्रिक्स यांना अटक करून त्यांच्या विरोधात महाराष्ट्र दारू बंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५ अ (ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रल्हाद पाटील, सहाय्यक पोलीस फौजदार संजय आंबेरकर, सुभाष खांदारे, पोलीस हेड कॉन्स्टेबल गुरुनाथ कोयंडे, जॅक्सन गोन्साल्विस, अमित तेली, ज्ञानेश्वर कांदळगावकर यांच्या भरारी पथकाने हि कारवाई केली आहे.