विनायक राऊतांसारख्या कानफुक्या नेत्यांमुळे ठाकरेंची सेना संपली, राजेश क्षीरसागरांचा गंभीर आरोप
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: November 4, 2022 06:21 PM2022-11-04T18:21:39+5:302022-11-04T18:23:09+5:30
खासदार विनायक राऊत हे नियुक्तीच्या गोष्टी सांगत असले तरी शिवसेना भाजप युती म्हणून ते निवडून आले आहेत. हे त्यांनी विसरू नये. मात्र, यापुढे ते विजयी होणार नाहीत.
सिंधुदुर्ग : खासदार विनायक राऊत यांना नेहमी कान फुंकण्याची सवय आहे. मी प्रामाणिक काम करीत असताना माझ्या विरोधात त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे कान फुंकण्याचे काम केले. विनायक राऊत यांच्यासारख्या कानफुक्या नेत्यांमुळे ठाकरेंच्या शिवसेनेचा ऱ्हास झाला. शिवसेना संपविण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. अशी बोचरी टीका राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष, माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली.
सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी जिल्हा दौऱ्यावर आलेल्या क्षीरसागर यांनी ओरोस येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी क्षीरसागर म्हणाले, अशी व्यक्ती यापुढे निवडून येऊ नये, यासाठी माझे प्रयत्न असतील. त्यांच्या विरोधात प्रचार करण्यासाठी मी या ठिकाणी येणार आहे. खा. राऊत हे २०२४ मध्ये खासदार नसतील, असेही क्षीरसागर यांनी स्पष्ट केले.
क्षीरसागर म्हणाले, गेली ३० वर्षे मी शिवसेनेत प्रामाणिकपणे काम केले, पक्षासाठी योगदान दिले. परंतु कार्यरत असताना शिवसेनेचे सचिव म्हणून कार्यरत असलेल्या राऊत यांनी माझ्या विरोधात पक्षप्रमुखांना भडकविण्याचे काम केले. त्यामुळे ठाकरे यांचा माझ्या विरोधात राग राहिला. त्यामुळेच मी पक्ष सोडून एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालो. खासदार विनायक राऊत हे नियुक्तीच्या गोष्टी सांगत असले तरी शिवसेना भाजप युती म्हणून ते निवडून आले आहेत. हे त्यांनी विसरू नये. मात्र, यापुढे ते विजयी होणार नाहीत.
त्यांनी स्वतःचे खोके भरले
निवडणूक कालावधीत पक्षाकडून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आणि पक्षाचे काम करण्यासाठी निधी दिला जातो. मात्र खासदार विनायक राऊत यांनी हा निधी कधी पदाधिकाऱ्यांपर्यंत दिला नाही. त्यांनी या निधीतून स्वतचे खोके भरले असल्याचा आरोपही शिरसागर यांनी केला.
पर्यटन समोर ठेवून विकास व्हावा
सिंधुदुर्ग या राज्यातील एकमेव पर्यटन जिल्ह्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. येथे रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजे. देवस्थाने व त्या ठिकाणी जाणारे रस्ते विकसित झाले पाहिजे, त्यासाठी निधी खर्च व्हावा अशी आमची भूमिका आहे. आगामी काळात त्याप्रकारे काम केले जाईल, असे राजेश क्षिरसागर यांनी स्पष्ट केले.