तालुका मुख्यालयाच्या इमारतीला गळती
By admin | Published: August 3, 2016 12:55 AM2016-08-03T00:55:43+5:302016-08-03T00:55:43+5:30
इमारतीच्या दर्जाबाबत साशंकता : भूमी अभिलेख, सहाय्यक निबंधक कार्यालयात पाणी
वैभव साळकर ल्ल दोडामार्ग
सुमारे १ कोटी रूपये खर्ची घालून बांधलेल्या दोडामार्ग तालुका मुख्यालय इमारतीला पुन्हा एकदा गळतीचे ग्रहण लागले आहे. दोन वर्षांपूर्वी ही गळती रोखण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेली तकलादू उपाययोजना अखेर बिनकामाची ठरली आहे.
मुख्यालयात वरच्या मजल्यावर असलेल्या भूमिअभिलेख व दुय्यम निबंधक कार्यालयात तर गळतीचे प्रमाण अधिक असल्याने कर्मचाऱ्यांवर ‘टीप टीप बरसा पाणी' असे म्हणण्याची वेळ आली आहे. या दोन्ही कार्यालयातील महत्त्वाचे दस्तऐवज छप्पराला लागलेल्या गळतीमुळे असुरक्षित असून, ते प्लास्टिकने झाकून ठेवले आहेत. इमारतीच्या या गळतीकडे दुर्लक्ष झाल्याने भविष्यात इमारतीचा स्लॅब कोणत्याही क्षणी कोसळणार तर नाही ना, अशी भीती कर्मचाऱ्यांना सतावत असून, याच भीतीच्या छायेखाली दैनंदिन कामकाज सुरू आहे. मात्र, या गंभीर परिस्थिीतीकडे सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनीही दुर्लक्ष केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
दोडामार्ग तालुक्याची तालुका मुख्यालयाची इमारत साधारणत: साडेतीन वर्षापूर्वी पूर्ण झाली. सुमारे १ कोटी रूपये या इमारतीवर खर्ची घालण्यात आले. मात्र, पहिल्याच पावसात इमारतीला गळती लागल्याने या इमारतीचे बांधकाम वादात सापडले होते. मात्र, त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्पुरती मलमपट्टी करून ही गळती रोखण्याचा केविलवाणा प्रयत्न केला होता. या मुख्यालयात खालच्या मजल्यावर तहसील कार्यालयाबरोबरच पोलिस ठाणे कार्यान्वित करण्यात आले. तर वरच्या मजल्यावर भूमिअभिलेख, दुय्यम निबंधक, तालुका कृषी कायालय व कसई-दोडामार्गसाठी तलाठी कार्यालयाकरिता जागा देऊन ही कार्यालये सुरू करण्यात आली. पण ही इमारत पहिल्याच पावसात गळायला सुरूवात झाली.
वास्तविक इमारत गळतीचा प्रकार ज्यावेळी उघड झाला, त्याचवेळी या इमारतीच्या दुरूस्तीसाठी बांधकाम विभागाने प्रयत्न करणे गरजेचे होते. पण केवळ घाईगडबडीत तात्पुरती मलमपट्टी करण्याचे काम उरकण्यात आले. शाश्वत उपाययोजना न केल्याने पुन्हा या इमारतीला गळती सुरू झाली. मुख्यालयात वरच्या मजल्यावर असलेल्या भूमिअभिलेख व दुय्यम निबंधक कार्यालयात गळतीचे प्रमाण अधिक आहे. या दोन्ही कार्यालयांत छपराला गळती लागली असून, भिंतीमधूनही पाणी झिरपत आहे. त्यामुळे महत्त्वाचे दस्तऐवज भिजत आहेत. संबंधित विभागावर कागदपत्रे झाकून ठेवण्याची वेळ कर्मचाऱ्यांवर आली आहे.
कर्मचारी भितीच्या छायेखाली : बांधकाम विभागाला गांभीर्यच नाही
भूमी अभिलेख आणि दुय्यम निबंधक कार्यालयातील कर्मचारी सध्या स्लॅबला लागलेल्या गळतीमुळे भितीच्या सावटाखाली वावरत आहेत. गळणारे पाणी कार्यालयात पसरू नये, यासाठी ते विविध पात्रांमध्ये साठविले जात आहे. पाणी गळून स्लॅब मात्र कमकुवत होत असल्याने कोसळण्याची भिती व्यक्त होत आहे. येथील कर्मचारी जीव मुठीत धरूनच आपले काम करत आहे. तालुका मुख्यालयाच्या इमारतीला गळती लागल्याबाबत संबंिधत कार्यालयाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार माहिती दिली आहे. मात्र गळती रोखण्यासाठी कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. त्यामुळे बांधकाम विभागास याचे गांभीर्यच नसल्याने कर्मचाऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.
सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचेही दुर्लक्ष
मुख्यालयाचे बांधकाम सुरू असताना सर्वच पक्षातील नेत्यांनी बांधकाम उत्कृष्ट दर्जाचे होण्यासाठी आंदोलने केली होती. तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाने म्हणावे तसे लक्ष दिले नसल्याने गळतीचे ग्रहण लागले.मात्र, या गंभीर प्रकाराकडे सत्ताधाऱ्यांसह विरोधकही जाणीवपूर्वक कानाडोळा करत असल्याने तालुकावासियांतून आश्चर्य व्यक्त होत आहे.