‘जैतापूर’साठी प्रसंगी सत्ता सोडू

By admin | Published: April 15, 2015 12:52 AM2015-04-15T00:52:08+5:302015-04-15T00:52:08+5:30

विनायक राऊत : प्रकल्पाविरोधात शिवसेना व्यापक लढा उभारणार

Leave Jaitapur for the occasion | ‘जैतापूर’साठी प्रसंगी सत्ता सोडू

‘जैतापूर’साठी प्रसंगी सत्ता सोडू

Next

राजापूर : फ्रान्ससमवेत झालेला करार केंद्र सरकारला महत्त्वाचा वाटत असला तरी आम्हाला जैतापूरवासीयांच्या जीवन-मरणाचा प्रश्न महत्त्वाचा वाटतो. त्यामुळेच या विनाशकारी प्रकल्पाविरुद्ध लढणाऱ्या जनतेच्या पाठीशी शिवसेना ठामपणे उभी राहिली आहे. आता तर निर्णायक लढाईची वेळ आली आहे. हा प्रकल्प कुठल्याही परिस्थितीत घालवून लावण्यासाठी यापुढे व्यापक स्वरूपाचा लढा उभारून त्यासाठी प्रसंगी सत्तेतून बाहेर पडावे लागले तरी चालेल, पण माघार घेणार नाही, असा हल्ला शिवसेना सचिव आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी चढविला.
दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फ्रान्स दौऱ्यात जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाबाबत तेथील अरेवा कंपनीशी एल अ‍ॅण्ड टी कंपनीचा सामंजस्याचा करार घडवून आणला होता. त्याचे प्रकल्प परिसरात जोरदार पडसाद उमटले. केंद्र व राज्यातील भाजप सरकारचा शिवसेना हा सत्तेतील भागीदार असून, भाजपने जैतापूर प्रकल्पाला पोषक भूमिका घेतल्याने शिवसेना संतप्त झाली. त्यानंतर सेनेचे सचिव व खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी यांनी मंगळवारी साखरीनाटे येथे जाऊन प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसह मच्छिमारांची बैठक आयोजित केली होती. यावेळी मच्छिमार नेते अमजद बोरकरही त्यांच्यासमवेत उपस्थित होते.
जैतापुरात अणुऊर्जा प्रकल्प येणार, याची कुणकुण लागल्यापासून येथील शेतकरी, बागायतदार, मच्छिमार यांनी प्राणपणाने प्रकल्पाविरुद्ध लढा सुरूच ठेवला आहे. त्यांना शिवसेनेने जाहीर पाठिंबा दिला. यापूर्वी अनेक जनआंदोलनात सक्रिय सहभागही नोंदवला. मागील सरकारप्रमाणेच विद्यमान केंद्र सरकारने जैतापूर प्रकल्पाला पाठिंबा दिला आहे. तसेच फ्रान्सच्या अरेवा कंपनीशी सामंजस्य करार केल्यामुळे आता या प्रकल्पातील अडथळे दूर होऊन अणुऊर्जा प्रकल्पाला लागणारे अभियांत्रिकी उत्पादन देशातच निर्माण होणार आहे, तर अरेवा कंपनीकडून अत्याधुनिक फोर्जिंग तंत्रज्ञान प्राप्त होणार आहे. पंतप्रधान मोदींनी केलेल्या त्या करारानंतर शिवसेना आक्रमक बनली आहे. कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प आम्ही होऊ देणार नाही, असे राऊत यांनी ठणकावून सांगितले. फ्रान्सशी झालेला करार सरकारला मोठा वाटत असला तरी आम्हाला प्रकल्पग्रस्त मोठे वाटतात. त्यांचे जीवन आमच्यासाठी मोलाचे आहे. म्हणूनच आम्ही आजवर येथील प्रकल्पग्रस्तांसमवेत राहिलो आहोत आणि यापुढेही राहू, असा विश्वास खासदार राऊत यांनी दिला.
आम्ही जैतापूरवासीयांना वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांच्या हितासाठी प्रसंगी सत्ता सोडू, पण आता गप्प बसणार नाही, असे बजावत खासदार राऊत यांनी भविष्यात केवळ प्रकल्प परिसरच नाही तर गावागावांत जनजागृती करत जैतापूर प्रकल्पाविरुद्ध तीव्र लढा उभारणार असल्याचे स्पष्ट केले.
आमदार राजन साळवी यांनीही केंद्र शासनावर तुफान टीका केली. आमच्या भावी पिढीसाठी व त्यांच्या रक्षणासाठी कुठल्याही परिस्थितीत हा प्रकल्प इथून हटलाच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. विजेचा तुटवडा जाणवत असेल तर कोयनेच्या चौथ्या टप्प्याला गती द्या, अशीही त्यांनी मागणी केली. यापुढे आमचे आंदोलन याहून अधिक तीव्र करू, असा इशारा त्यांनी दिला.
मच्छिमारांच्या हितासाठी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प रद्द करा, अशी मागणी अमजद बोरकर यांनी केली. यावेळी उपस्थित प्रकल्पग्रस्तांनी अणुऊर्जा प्रकल्पाविरुद्ध घोषणा दिल्या.
या बैठकीला पंचायत समितीचे सदस्य दीपक नागले, रेखा कोंडेकर, राजन कोंडेकर, विभागप्रमुख राजा काजवे यांच्यासह प्रकल्पग्रस्त शेतकरी व मच्छिमार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Leave Jaitapur for the occasion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.