एलईडी बल्बचे होणार साम्राज्य
By admin | Published: November 5, 2015 12:17 AM2015-11-05T00:17:58+5:302015-11-05T00:19:48+5:30
विजेची बचत : राज्यात १ लाख ६२ हजार ग्राहकांना लाभ
राजापूर : वीज बचतीमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या एलईडी बल्बचा वापर मोठ्या प्रमाणात व्हावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. राज्यातील १ कोटी ६२ लाख घरगुती ग्राहकांना सवलतीच्या दरात एलईडी बल्बचे वाटप करण्यात आल्याने भविष्यात राज्यात एलईडी बल्बचेच साम्राज्य निर्माण होणार आहे.
एकीकडे विजेचा अमर्यादीत वापर तर दुसरीकडे वीज निर्मितीची मर्यादीत साधने यामुळे महाराष्ट्र राज्यासहित देशाला वीज संकटाचा सामना करावा लागत आहे. यापूर्वी सर्वत्र सीएफएल किंंवा आयसीएल बल्बच्या वापरामुळे ज्या प्रमाणात वीज खर्च होत होती त्यापेक्षा खूपच कमी वीज ही एईडीमुळे खर्च होत आहे. जवळपास ८० टक्के वीजबचत या बल्बच्या वापरामुळे होते. राज्यात वीज पुरवठा करणारी महावितरण ही सर्वात मोठी कंपनी आहे. त्यांचे राज्यात १ कोटी ६२ लाख ६१ हजार ४२० ग्राहक आहेत. त्यांना १६ हजार ६५७ दशलक्ष युनिट वीज लागते व एकूण वापराच्या १९.४५ टक्के वीज वापर या ग्राहकांकडून होतो. आजवर बहुतांशी ग्राहकांनी सीएफएल किंंवा आसीएल बल्बचाच वापर केला आहे व अजून देखील तो चालूच आहे. त्यामुळे विजेचा जास्त वापर होतो. एलईडी बल्बमुळे एकूण ८० टक्के विजेची बचत होते.
त्यामुळे प्रतिनग ४०० रुपयांना विक्री होत असलेले एलईडी बल्ब ग्राहकांना सवलतीच्या दरात १०० रुपये प्रती नग उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. त्यामुळे १ कोटी ६२ लाख घरगुती ग्राहकांना हे बल्ब प्राप्त होतील. या बल्बचे २५ हजार तास जीवनमान असून, हा बल्ब ७ वॅटचा असणार आहे. त्याला ३ वर्षाची रिप्लेसमेंट वॉरंटी असेल. प्रत्येक वीज ग्राहकाला चालू वीज देयके दाखवून हे बल्ब खरेदी करता येतील तसेच प्रती बल्ब १० रुपये भरुन उर्वरीत रक्कम वीज देयकात १० हप्त्यात भरण्याची सुविधा देखील महावितरणने दिली आहे. त्यामुळे या बल्बकडे ग्राहकांचा प्रचंड ओढा आहे.
मागील काही महिन्यात मोठ्या प्रमाणात या बल्बची खरेदी ग्राहकांनी केली आहे. भविष्यात संपूर्ण राज्य एलईडी बल्बने झगमगून जाणार आहे. त्यामुळे विजेची बचत होणार आहे. (प्रतिनिधी)
आगामी संकट : आत्तापासूनच उपाययोजना
आगामी काळात येणारे विजेचे संकट ही फार मोठी समस्या आहे. त्यामुळे या संकटाला रोखण्यासाठी आत्तापासूनच शासनाने प्रयत्न चालवले आहेत. त्यामुळे शासनाकडून एलईडी बल्बचे वितरण सुरु करण्यात आले आहे.
माफक किंमत
एलईडी बल्बची किंमत माफक आहे. तसेच त्यापासून वीजबचतही होणार आहे. पर्यायाने वीजबिलातही कित्येक पटीने अधिक बचत होणार आहे.