रत्नागिरीचे पोलीस वापरताहेत एलईडी दिवे
By admin | Published: February 4, 2015 09:37 PM2015-02-04T21:37:03+5:302015-02-04T23:52:19+5:30
दर्जेदार कंपन्यांच्या एलईडी दिव्यांची जास्त किंमत हे त्या मागील एक महत्त्वाचे कारण आहे. यावर उपाय म्हणून ग्रामीण भागात वापरण्यास परवडतील, अशा वाजवी दरात हे दिवे उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
रत्नागिरी : वीज बचतीच्या एलईडी दिव्यांचा व्यापक स्वरुपात प्रचार करण्याची केंद्र सरकारची योजना अजून कागदावरच असली तरी रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे यांच्या पुढाकाराने येथील पोलिसांनी घरगुती पातळीवर हे दिवे वापरण्यास सुरुवात केली आहे.कमी शक्ती वापरून जास्त प्रकाश देणाऱ्या एलईडी दिव्यांचा जगात सर्वत्र वापर केला जातो. आपल्या देशात त्याचे प्रमाण अत्यल्प असून, दर्जेदार कंपन्यांच्या एलईडी दिव्यांची जास्त किंमत हे त्या मागील एक महत्त्वाचे कारण आहे. यावर उपाय म्हणून ग्रामीण भागात वापरण्यास परवडतील, अशा वाजवी दरात हे दिवे उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. राजवाडी (संगमेश्वर) येथील पीपल्स एम्पॉवरिंग मुव्हमेंट (पेम) या संस्थेतर्फे वीज बचत हीच वीज निर्मिती हे तत्व स्वीकारुन गावातील कुटुंबांना या दिव्यांची विक्री केली जात आहे. गेल्या महिन्यात झालेल्या बचत गटांच्या हळदी-कुंकू कार्यक्रमातही हे दिवे वाण म्हणून लुटण्यात आले. पोलीस अधीक्षक डॉ. शिंदे यांना या उपक्रमाबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी रत्नागिरी पोलीस मुख्यालयातील विविध वस्तू विक्री केंद्रात हे दिवे पोलिसाना घरगुती वापरासाठी रास्त दरात उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार लगेच अंमलबजावणीही केली. या योजनेचा शुभारंभ डॉ. शिंदे यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला. उपनिरीक्षक पी. डी. यादव आणि पेम संस्थेचे अध्यक्ष सतीश कामत याप्रसंगी उपस्थित होते. (प्रतिनिधी)