वेंगुर्ले महोत्सवावर सत्ताधीशांचाच बहिष्कार
By Admin | Published: February 11, 2016 11:00 PM2016-02-11T23:00:48+5:302016-02-11T23:33:13+5:30
आठ नगरसेवकांची माहिती : निमंत्रण पत्रिकेतून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना वगळल्याच्या निषेधार्थ कृत्य
वेंगुर्ले : वेंगुर्ले नगरपरिषदेवर राष्ट्रवादीची सत्ता असूनही पक्षातून चिन्हावर निवडून आलेले नगराध्यक्ष प्रसन्ना कुबल यांच्या एकाधिकारशाहीला मुख्याधिकारी बळी पडले आहेत. पक्षीय राजकारण करून वेंगुर्ले नगरपालिका पर्यटन महोत्सव निमंत्रण पत्रिकेत भाजपच्या आजी-माजी नेत्यांना स्थान देऊन राष्ट्रवादीच्या नेत्यांचा मात्र विसर पडला आहे. त्यामुळे हा महोत्सव नगरपालिकेचा की भाजपचा, असा जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे.
ज्या महोत्सवात राष्ट्रवादीच्या नेत्यांना स्थान नाही, अशा महोत्सवावर आपण पक्षनिष्ठा म्हणून स्वाभिमानाने बहिष्कार टाकणार असल्याची माहिती वेंगुर्ले नगरपरिषदेतील राष्ट्रवादीच्या आठ नगरसेवकांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा व विद्यमान नगरसेविका नम्रता कुबल, वामन कांबळी यांच्या नेतृत्वाखाली मुख्याधिकाऱ्यांना तसे निवेदनही नगरसेवकांनी देत रोष प्रकट केला.
वेंगुर्ले नगरपरिषदेने आयोजित केलेल्या ‘वेंगुर्ले पर्यटन महोत्सव २०१६’च्या निमंत्रण पत्रिकेमध्ये नगरपरिषद राष्ट्रवादीची एकहाती सत्ता असतानाही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर स्थानिक आजी-माजी आमदार, खासदार व जिल्हाध्यक्ष यांना वगळून भाजपच्या नेत्यांना स्थान दिले आहे. याचा निषेध करण्यासाठी नगरपरिषदेचे गटनेते वामन कांबळी, नम्रता कुबल, डॉ. पूजा कर्पे, महेश वेंगुर्लेकर, पद्मिनी सावंत, मनीष परब, शहराध्यक्ष शैलश गावडे, अन्नपूर्णा नार्वेकर यांनी पत्रकार परिषदेत भूमिका मांडली.
गटनेते वामन कांबळी यांनी सांगितले की, नगरपरिषदेवर राष्ट्रवादीची सत्ता आल्यावर आताचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या निधीतून कचरागाडी, हायमास्ट लॅब, राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाण यांच्या निधीतून फॉगिंग मशिन, आमदार निरंजन डावखरे यांनी अॅम्ब्युलन्स, किरण पावसकर यांनी कचरा गाडी, आमदार अनिल तटकरे यांनी २५ लाखांचा निधी आघाडी सरकारची सत्ता असताना दिला होता.
तसेच समाजोपयोगी प्रकल्पाची तरतूद केली होती. कांडी कोळसा प्रकल्प त्याचाच भाग असून, त्यामुळेच स्वच्छ वेंगुर्ले हा पुरस्कार नगरपरिषदेला मिळाला आहे.
अग्निशमन केंद्र असोसिएशन, नगरपालिका कामगारांसाठी स्टाफ कॉटर्स, असोसिएशन अशा अनेक प्रकल्पांसाठी निधी आघाडीतील नेत्यांनी नगरपरिषदेला दिला आहे. याचा विसर नगराध्यक्ष प्रसन्न कुबल यांना पडला आहे, अशी माहिती देऊन नगराध्यक्षांना राष्ट्रवादीची आठवण करून देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्याधिकारी अनभिज्ञ
महोत्सवाची निमंत्रण पत्रिका सभागृहासमोर येण्याची आवश्यकता
होती. मात्र, ही निमंत्रण पत्रिका
थेट आपल्यासमोर आल्याचे वेंगुर्ले मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी सांगितले. त्यामुळे निमंत्रण पत्रिका नगराध्यक्षांनीच नावानिशी तयार केल्याचे सांगितले. (वार्ताहर)
सभागृह परवानगीशिवाय निमंत्रण पत्रिका
पर्यटन महोत्सवाला सभागृहात दहा लाखांच्या निधीची तरतूद केली होती. यामध्ये महोत्सवास माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार अनिल तटकरे, निरंजन डावखरे, चित्रा वाघ यांना निमंत्रित करावे, असे लेखी पत्र देऊन निमंत्रण देण्याचे मुख्याधिकाऱ्यांना या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी सांगितले होते. मात्र, याकडे कानाडोळा करीत महोत्सवाच्या आदल्या दिवशीपर्यंत निमंत्रण पोहोचले नाही व पुरस्कारासाठी गेलेले राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष व मुख्याधिकारी भेटलेही नाहीत, असा आरोप पत्रकार परिषदेत नगरसेवकांनी केला. त्यामुळे निमंत्रणे नगरसेवकांच्या पश्चातच दिल्याचेही सांगितले.
महोत्सव पक्षाचा नाही पालिकेचा : नम्रता कुबल
पत्रकार परिषदेत नम्रता कुबल यांनी नगराध्यक्षांवर चौफेर टीका केली. तसेच वेंगुर्ले पर्यटन महोत्सव अधिकृत नगरपालिकेचा असून, तो कुठल्या पक्षाचा नाही. असे असताना कार्यक्रम पत्रिकेवर ठरावीक पक्षाच्या नेत्यांना आमंत्रित करून नगराध्यक्षांबरोबर मुख्याधिकाऱ्यांनी महोत्सवाला राजकीय स्वरूप देण्याचा प्रयत्न केला आहे. शहरात पाणीप्रश्न गंभीर असताना नगरपरिषदेचे कार्यालय वेळेअगोदर बंद करून महोत्सवास वेळ देत असल्याचा आरोपही नगरसेवकांनी केला. त्यामुळे नगराध्यक्ष प्रसन्ना कुुबल यांना शहरवासीयांचा विसर पडला असला, तरी मुख्याधिकाऱ्यांनी याचे भान ठेवावे, असा इशारा दिला. महोत्सव पालिकेचा आहे पक्षाचा नाही याचे भान ठेवावे, असे सुनावले.