बिबट्याच्या बछड्याचा छळ केला नाही, त्या ग्रामस्थांच्या पाठीशी गाव
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 10:04 PM2018-11-10T22:04:15+5:302018-11-10T22:04:23+5:30
सातार्डा येथील बिबट्याच्या बछड्याला पकडून त्याचा छळ केल्या प्रकरणाचा गुन्हा वनविभागाने दाखल केला असतानाच आता सातार्डा येथील ग्रामस्थ ही चांगलेच आक्रमक झाले आहे.
सावंतवाडी : सातार्डा येथील बिबट्याच्या बछड्याला पकडून त्याचा छळ केल्या प्रकरणाचा गुन्हा वनविभागाने दाखल केला असतानाच आता सातार्डा येथील ग्रामस्थ ही चांगलेच आक्रमक झाले आहे. गेले काही महिने बिबट्याकडून आमच्या कोंबड्या कुत्र्यावर हल्ला झाला तेव्हा पर्यावरण प्रेमी कुठे होते. असा सवाल करत ग्रामस्थांवर कारवाई करून दाखवावीच असे आवाहन सातार्ड्याचे माजी सरपंच उदय पारिपत्ये यांनी दिले आहे. बिबट्याच्या बछड्याचा छळ केला नव्हता तर त्याला सुरक्षित स्थळी ठेवण्यात येत होते. हा त्याचा गुन्हा आहे का?, असा प्रश्न ही ते उपस्थित करत आहेत.
सातार्डा येथील अंगणात आलेल्या बिबट्याच्या बछड्याचा ग्रामस्थांनी छळ केल्याचा आरोप करत व्हिडीओ व्हायरल करण्यात आला होता. या व्हिडीओवरून वनविभागाने शुक्रवारी गुन्हा दाखल केला आहे. तसेच याबाबत चौकशी समिती ही नेमण्यात आली आहे. मात्र सातार्डा गावात बिबट्याच्या बछड्याचा छळ केला नसून त्या बछड्याला उलट आम्ही सुरक्षित स्थळी घेऊन गेलो. तसेच त्याला वनविभागाच्या ताब्यात दिले आहे, असे खुलासा स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे.
जर पर्यावरण प्रेमींना आम्ही या बिबट्याच्या बछड्याचा छळ केला, असे वाटत असेल तर आतापर्यंत सातार्ड्यातील ती पाच ते सहा घरे बिबट्याच्या दहशतीखाली कशी वावरत होती. ते बघावे बिबट्याने आतापर्यंत कुत्र्यावर तसेच कोंबड्यावर हल्ले केले होते. तो कधी ही घरामध्ये ही शिरू शकला असता मग पुढे होणारी हानी कोण भरून काढणार होते, असा सवाल ही ग्रामस्थांनी केला आहे. सातार्ड्याचे माजी सरपंच उदय पारिपत्ये यांनी आम्ही पूर्ण गाव सातार्डा येथील त्या ग्रामस्थांच्या बाजूने आहे.
जर कोणाला वाटत असेल ग्रामस्थांनी छळ केला असे तर त्यांच्याशी चर्चा करावी त्यातून सत्य बाहेर येईल, बिबट्याच्या बछड्याचा कोणी ही छळ केला नाही. उलट या बछड्याला सुरक्षित स्थळी हलवून तो वनविभागाच्या ताब्यात देण्यात आला आहे. त्यानंतर वनविभागाने त्याच्यावर उपचार करून जंगलात सोडले आहे. वनविभागाने गुन्हा दाखल केला आहे. पण यांची सखोल चौकशी करावी नंतरच कारवाईची भाषा करावी आम्ही ग्रामस्थ पूर्णपणे त्या ग्रामस्थांच्या बाजूने असल्याचे ही यावेळी पारिपत्ये यांनी स्पष्ट केले.