भक्ष्याच्या शोधात आलेला बिबट्या पडला विहिरीत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2018 06:48 PM2018-11-18T18:48:38+5:302018-11-18T18:48:55+5:30
साटेली-सातार्डा परिसरात बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे.
सावंतवाडी : साटेली-देवळसवाडी येथे घरालगत असलेल्या विहिरीत भक्ष्याच्या शोधात आलेला बिबट्या पडला. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. दरम्यान, याबाबतची माहिती वनविभागाला समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करून नैसर्गिक अधिवासात सोडले.
साटेली-सातार्डा परिसरात बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. बऱ्याचदा बिबट्यांचे दर्शन अनेकांना झाले आहे. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण असतानाच शनिवारी रात्री रामचंद्र बावकर यांच्या घराशेजारी असलेल्या विहिरीत बिबट्या पडला. सकाळी हा बिबट्या ग्रामस्थांच्या नजरेस पडल्यानंतर त्याठिकाणी अनेकांनी धाव घेतली. बिबट्याला पाहण्यासाठी बघ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, या घटनेची माहिती ग्रामस्थ प्रशांत साटेलकर यांनी वनविभागाला दिली. वनविभागाच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.
यावेळी वनक्षेत्रपाल गजानन पानपट्टे, वनरक्षक विशाल पाटील, ज्ञानेश्वर जाधव, विश्वनाथ माळी, संतोष मोरे, सागर ओझन आदींनी ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीत पडलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी विहिरीत दोरीच्या सहाय्याने पिंजरा सोडला. त्यानंतर शर्थीच्या प्रयत्नाने बिबट्याला पिंजऱ्यात बंदिस्त करण्यात वनविभागाला यश आले.
या मदत कार्यात बबन रेडकर, संजय नाईक, प्रशांत साटेलकर, सुरेश नाईक, सुधीर बावकर, पिंट्या कुबल आदी ग्रामस्थांनी सहभाग घेतला.
दरम्यान, मानवी वस्तीत बिबट्या शिरू लागल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पकडलेला बिबट्या मादी जातीचा आहे. तसेच त्याचे वय सुमारे तीन वर्षांचे असावे, असे वनक्षेत्रपाल गजानन पानपट्टे यांनी सांगितले. बिबट्यावर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत उपचार करून उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.