...अन् बिबट्या थेट भरवस्तीतल्या 20 फूट उंच नारळाच्या झाडावर चढला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 12:02 PM2019-11-29T12:02:20+5:302019-11-29T12:03:55+5:30
कारीवडे गवळीवाडी येथील प्रकार
सावंतवाडी : भक्ष्याच्या शोधात असलेल्या बिबट्याने कारीवडे गवळीवाडी भर वस्तीत शिरकाव केला. दहा ते पंधरा कुत्र्यांच्या कळपात सापडताच बिथरलेल्या बिबट्या जिवाच्या भीतीने चक्क घरा शेजारच्या २० ते २५ फूट उंच नारळाच्या झाडावर चढला. आज पहाटे घडलेल्या या घटनेने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
भुकेने व्याकूळ झालेल्या बिबट्याने भक्ष्याच्या शोधात कारीवडे गवळीवाडीतील वस्तीत शिरला. मात्र दहा ते पंधरा कुत्र्यांच्या कळपासमोर त्याचा निभाव लागला नाही. कुत्र्यांनी पाठलाग केल्याने अखेर बिथरलेल्या बिबट्याने लक्ष्मण भालेकर यांच्या घरा शेजारील नारळाच्या झाडाचा आधार घेतला. बिबट्या चढलेल्या झाडाखाली कुत्र्याच्या कळपाने ठाण मांडल्याने त्याने खाली उतरण्याचे धाडस केले नाही.
कुत्र्यांचे भुंकणे जोरजोरात चालू असल्याने घर मालक विश्ननाथ भालेकर यांनी बाहेर येऊन पाहिले असता ते दृश्य त्यांच्या नजरेस पडले. त्यांनी याबद्दलची माहिती तात्काळ वन विभागाला दिली. यानंतर वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी झाडाला काठी लावून बिबट्याला खाली उतरवण्यासाठी प्रयत्न केला. याचवेळी बिबट्याने उडी टाकली व जंगलाच्या दिशेने पळून गेला.