विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू
By admin | Published: July 14, 2017 10:49 PM2017-07-14T22:49:59+5:302017-07-14T22:49:59+5:30
विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
दापोली : भक्ष्याचा पाठलाग करणारा बिबट्या विहिरीत पडून मृत झाल्याची घटना दापोली तालुक्यातील शिरशिंंगे येथे घडली. दापोली वनविभागाच्या कार्यालयाच्या आवारात या बिबट्याचे दहन केले.
शुक्रवारी सकाळी शिरशिंगे मराठवाडी येथील किरण जंगम यांच्या विहिरीत हा प्रकार घडला. जंगम यांच्या घराच्या आवारात २५ फूट खोलीची विहीर असून, सध्या या विहिरीत दहा फुटांवर पाणी आले आहे. विहिरीतील पाण्याचा पंप बंद पडल्याने जंगम यांचे कुटुंबीय विहिरीजवळ गेले असता त्यांना एक बिबट्या तरंगताना दिसला. ही गोष्ट गावच्या पोलीसपाटलांना कळविली.
पोलीसपाटलांनी तातडीने ही बाब वन विभाग आणि दापोली पोलिसांना कळविली. परिक्षेत्र वनाधिकारी सुरेश वरक, वनपाल मारुती जांभळे, वनरक्षक अमित निंबकर व महादेव पाटील तत्काळ शिरशिंगे येथे दाखल झाले. ग्रामस्थांच्या सहकार्याने वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याला विहिरीबाहेर काढले. हा बिबट्या नर जातीचा असून, त्याचे वय ६ वर्षे असल्याचे वरक यांनी सांगितले. गुरुवारी सायंकाळी किंवा रात्री हा बिबट्या भक्ष्याचा पाठलाग करीत असताना विहिरीत पडला असल्याची आणि पाण्यात बुडूनच त्याचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता त्यांनी वर्तविली आहे. या बिबट्याचे दापोली येथील वनविभागाच्या कार्यालयाच्या आवारात दहन केले.