भक्ष्याच्या शोधात बिबट्या अडकला पोल्ट्रीत, सिंधुदुर्गातील तिथवली येथील घटना
By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: April 4, 2025 19:02 IST2025-04-04T19:02:30+5:302025-04-04T19:02:56+5:30
वनविभागाने पिंजऱ्यात पकडून सोडले नैसर्गिक अधिवासात

भक्ष्याच्या शोधात बिबट्या अडकला पोल्ट्रीत, सिंधुदुर्गातील तिथवली येथील घटना
वैभववाडी : तिथवली येथे भक्ष्याच्या शोधात असलेला बिबट्या गुफरान निजाम काझी यांच्या पोल्ट्री शेडमध्ये गुरुवारी (दि. ३) रात्री अडकला. शुक्रवारी (दि.४) सकाळीच हा प्रकार निदर्शनास झाला. या बिबट्याला पकडून वनविभागाने नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.
तिथवली येथील काझी यांची गावातच कुक्कटपालन शेड आहे. या शेडला पाच ते सहा फुटापर्यंत लोखंडी जाळी असून त्यावर शेडनेट बसविलेली आहे. शुक्रवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास काझी हे नेहमीप्रमाणे कुक्कटपालन शेडकडे गेले असता त्यांना शेडमध्ये बिबट्या दिसून आला. मात्र त्याला शेडमधून बाहेर पडता येत नव्हते. ही माहिती त्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्यानंतर वनपाल हरी लाड यांच्यासह सर्व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी शेडच्या दरवाजानजीक सापळा लावला. काही वेळानंतर बिबट्या पिंजऱ्यात गेला. त्यानंतर वन अधिकाऱ्यांनी बिबट्याला नैसर्गिक अधिवासात नेऊन सोडले. बिबट्या अडकल्याची माहिती मिळताच त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.
आम्ही पिंजरा लावला नव्हता : लाड
तिथवली येथे अडकलेल्या बिबट्यासंदर्भात माहिती मिळाल्यानंतर आमचे पथक घटनास्थळी पिंजऱ्यासह पोहोचले. त्यानंतर बिबट्याला पिंजऱ्यातून नैसर्गिक अधिवासात सोडले. मात्र, काही लोकांकडून बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावल्याची माहिती पसरविली. ती चुकीची आहे, असे वनपाल हरी लाड यांनी स्पष्ट केले.