भक्ष्याच्या शोधातील बिबट्या पडला विहिरीत
By admin | Published: March 24, 2017 11:33 PM2017-03-24T23:33:23+5:302017-03-24T23:33:23+5:30
भालावलमधील प्रकार : दोन तासानंतर बाहेर काढले
ओटवणे : शिकार करण्यासाठी भालावल लोकवस्तीत घुसलेल्या बिबट्याचा कुत्र्यांच्या झुंडीने पाठलाग केल्याने जीव वाचविण्याच्या नादात तो शेत विहिरीत कोसळला. कुत्र्याच्या भुंकण्यामुळे विहिरीच्या मालकाला हे समजताच त्यांनी वनखात्याला माहिती दिली. त्यानंतर सकाळी ११ वाजता बिबट्याला जेरबंद करण्यात आले.
भालावल तसेच आजूबाजूच्या परिसरात हिंस्त्र श्वापदांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. बिबट्याने यापूर्वी येथील गुरे, तसेच माणसांवरही हल्ला चढविला आहे. दरम्यान, शुक्रवारी पहाटे शिकार शोधण्याच्या प्रयत्नात हा बिबट्या भालावल-फौजदारवाडीत घुसला. येथील गोविंद परब यांच्या कुत्र्याला भक्ष्यस्थानी पाडण्याचा प्रयत्न बिबट्याने केला; पण त्या कुत्र्याच्या भुंकण्याने इतर कुत्रे जमा झाले. या कुत्र्यांनी बिबट्यावर जोरदार प्रतिहल्ला चढविला. मात्र, बिबट्याने येथून धूम ठोकली आणि नजीकच कठडा नसलेल्या शेत विहिरीचा अंदाज न आल्याने बिबट्या विहिरीत कोसळला. विहिरीत काहीतरी पडल्याचा आवाज येताच विहीर मालक गोविंद परब, तसेच संदीप परब, शैलेश परब यांनी धाव घेत पाहणी करताच बिबट्या विहिरीत पडल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तातडीने वनविभागाला याची कल्पना दिली.
यावेळी वनविभागाच्या पथकासह ग्रामस्थांच्या सहकार्याने सुमारे दोन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर सकाळी ११ वाजता बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात यश आले. यावेळी वनक्षेत्रपाल
एन. एच. कदम, वनरक्षक रमेश पाटील, बांदा वनपाल एस. एस. शिरगावकर, ए. सी. राठोड, पोलिस कर्मचारी नागेश गावकर, उपसरपंच समीर परब, माजी उपसभापती विनायक दळवी, कृष्णा सावंत, अशोक परब, प्रकाश दळवी, विठ्ठल दळवी यांनी सहकार्य केले.
ओटवणे पंचक्रोशीत ही बातमी पसरताच बिबट्याला पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी भालावल येथे झाली होती. लोकवस्तीत बिबट्यांचा वाढता वावर आणि मानवी वस्तीवर होणारे हल्ले यामुळे माजी उपसभापती विनायक दळवी यांनी वनकर्मचाऱ्यांना सक्त ताकीद देत बिबट्याला या परिसरापासून दूर सोडण्याची मागणी केली. (प्रतिनिधी)
शिकाऱ्याचीच शिकार अन् जीवदानही
कुत्र्याची शिकार करण्यासाठी आलेल्या बिबट्याला कुत्र्यांच्या कळपाने पळवून लावले. त्यामुळे कुत्र्यांच्या पाठलागामुळे बिबट्या मार्ग मिळेल तिकडे पळत होता. सुमारे अर्ध्या तासाच्या थरारानंतर बिबट्या विहिरीत पडला. त्यावेळी मात्र बिबट्या जिवाच्या आकांताने ओरडू लागला. परिणामी, विहीरमालक परब यांनी वनखात्याला कळवून त्याला जीवदान दिले.